जयंत पाटील ‘इन अ‍ॅक्शन मोड’! सांगलीत कडक लॉकडाऊन

जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

116

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ५६८ वर पोहोचली असून, ३ मे रोजी ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. प्रशासनाशी चर्चा करुन सांगली जिल्ह्यात ५ मे रोजी मध्यरात्रीपासून ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.

जीवनावश्यक वस्तू नाही, जीवन महत्त्वाचे

सांगली जिल्ह्याला ऑक्सिजनचा काठावर पुरवठा होतोय, प्रचंड ताकद खर्च करुन बाहेरुन ऑक्सिजन मिळवावा लागत आहे. औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत, म्हणून ही शृंखला मोडण्यासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे होते. जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती, जयंत पाटील यांनी केली.

(हेही वाचाः पोलिस दलातही कोरोनाचे थैमान… मृतांचा आकडा वाढला)

सांगलीकरांनो घरी रहा, सुरक्षित रहा

तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. त्यामुळे घरीच रहा, सुरक्षित रहा असे आवाहनही जयंत पाटील यांनी नागरिकांना केले आहे. पालकमंत्री जयंत पाटील हे १ मे पासून सांगलीत तळ ठोकून आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती, रुग्णसंख्या, उपलब्ध बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सर्व गोष्टींचा आढावा ते घेत आहेत. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि अन्य भागांत कोरोनाची परिस्थिती भयावह आहे. या ठिकाणीही सलग दोन दिवस बैठक घेत, कोरोना नियंत्रण आणण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देशही जयंत पाटील यांनी दिले आहेत.

कोल्हापूरमध्येही कडक लॉकडाऊन

राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे राज्य सरकारने 15 मेपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला होता. मात्र आता ग्रामीण भागात रुग्ण वाढत असल्याने आता तिथे देखील आणखी कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. वेगाने वाढत असलेली रुग्णसंख्या, आरोग्य सुविधांवर पडत असलेला अतिरिक्त ताण आणि बेड, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा यामुळे आता जिल्हास्तरावर कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला जात आहे. सातारा जिल्ह्यात आणि बारामतीमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर सांगलीपाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात देखील संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.