JEE आणि NEET च्या मुलांना सात महिन्यांपासून टॅब आणि पुस्तके मिळेनात

JEE आणि NEET च्या परीक्षांचे ऑनलाइन प्रशिक्षण घेणा-या ओबीसी, व्हीजे-एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना गेल्या सात महिन्यांपासून पुस्तके, टॅब मिळाले नसल्याने, महाज्योती या प्रशिक्षणावर खर्च करत असलेला कोट्यावधींचा निधी वाया जात आहे.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, ओबीसी, व्हीजे-एनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या नि:शुल्क प्रशिक्षणासाठी कार्यरत आहे. महाज्योतीला यावर्षी अर्थसंकल्पात 250 कोटी दिले आहेत.

( हेही वाचा: पुस्तकांचीही झाली होती फाळणी; त्यावेळचा ‘हा’ जगप्रसिद्ध फोटो पाहिलात का? )

विद्यार्थ्यांना पुस्तके, टॅब देण्यात आले नाहीत 

अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण गेल्या सात महिन्यांपासून सुरु झाले. हे विद्यार्थी आता इयत्ता बारावीत गेले आहेत. परंतु त्यांना पुस्तके, टॅब किवा इंटरनेट यापैकी काहीही देण्यात आले नाही. हे विद्यार्थी सन 2023 मध्ये JEE आणि NEET ची परीक्षा देणार आहेत. राज्यातील 8 हजार 922 विद्यार्थ्यांनी महाज्योतीकडे नि:शुल्क प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे.

JEE आणि NEET प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण सुरु राहील. त्यांना या महिन्यात पुस्तके, टॅब देण्याची व्यवस्था केली जाईल, असे महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here