मुंबईत जिओ फायबर इंटरनेट सेवा खंडित करण्याचा प्रकार सुरू, काय आहे कारण?

98

मुंबईत पसरत चाललेले जिओ फायबर इंटरनेटचे जाळे मोडून काढण्याचा प्रकार सुरु आहे. अनेक ठिकाणी जिओ फायबर इंटरनेटची केबल कापून इंटरनेट सेवा खंडित करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केबल कापून सेवा खंडित करण्याच्या घटनांमागे इतर इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्या अथवा स्थानिक इंटरनेट केबल चालकांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिओ फायबरकडून पुरविण्यात येणाऱ्या इंटरनेट सेवेमुळे इतर इंटरनेट व्यवसायिकांचे नुकसान होत आहे, त्यामुळे असे प्रकार घडत आहेत.

इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठी रस्सीखेच सुरु असताना रिलायन्सच्या जिओ फायबर इन्फो कॉम लिमिटेड कंपनीने ग्राहकांना आकर्षक करण्यासाठी स्वस्त दरात इंटरनेटचे चांगले पॅकेज देण्यास सुरु केले आहे. मुंबईसह अनेक शहरात ग्राहकांनी इतर इंटरनेट कनेक्शनकडे पाठ फिरवून जिओ फायबर सेवा घेतली आहे.

ग्राहकांना स्वस्त आणि चांगली सेवा देण्याकडे जिओ फायबरचा कल असल्यामुळे स्थानिक केबल ऑपरेटर तसेच इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. मागील काही आठवड्यांपासून बोरिवली परिसरात जिओ फायबरच्या इंटरनेट सेवा खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बोरिवलीतील हिना इलिगन्स इमारत आणि साईबाबा नगर या परिसरात १ एप्रिल रोजी जिओ फायबरची इंटरेनेट केबल चेंबर मध्ये उतरून कापण्यात आली होती, दुसरी घटना बोरिवली पश्चिम येथील आयसी कॉलनी , क्रॉस रोड या ठिकाणी असलेले जिओ फायबरचे केबल कापण्यात आल्यामुळे दिवसभर येथील इंटरनेट सेवा खंडित झाली होती. इंटरनेट सेवा खंडित होत असल्यामुळे ग्राहकाचे मोठे नुकसान झाले असले तरी जिओ फायबर कंपनींने काही तासात केबल जोडून इंटरनेट सेवा पुन्हा सुरु केली आहे.

याप्रकरणी जिओ फायबरचे इंजिनिअर विनोद यादव यांनी बोरिवली आणि एमएचबी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून केबल कापणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जाते. जिओ फायबरचे केबल कापण्याच्या प्रकारामुळे कंपनीची डोकेदुखी वाढली असून केबल कापून सेवा खंडित करण्याच्या घटनांमागे इतर इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्या अथवा स्थानिक इंटरनेट केबल चालकाचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.