लहान मुलं ही उत्तम नट असतात. अभ्यास करायचं नसेल तर लगेच त्यांच्या पोटात दुखू लागतं, कधीकधी खोटंखोटं रडतात. हा अभिनयाचा गुण अंगभूत असतो आणि अनेकांचं ते क्षेत्र नसल्यामुळे हा गुण जोपासला जात नाही. परंतु राजकारणामध्ये एक असं महान व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी आपल्या बालपणीचा हा गुण जोपासला आहे आणि त्यास कुरवाळत देखील आहेत. ते म्हणजे आदरणीय माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड.
लोकशाहीच्या मूल्यांना पायदळी तुडवत आहेत
जितेंद्र आव्हाड यांची एक स्टाईल आहे. जेव्हा ते इतरांवर आरोप करतात तेव्हा ते खूपच आक्रमक दिसतात. मग त्यांच्यातला गुंड त्यांच्यातल्या नेत्यावर हावी होतो आणि ते बर्याचदा विसरुन जातात की आपण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संवैधानिक पदावर आहोत. आणि त्यांना विसर पडल्यामुळे ते संविधानाचा अपमान करतात व लोकशाही मूल्ये पायदळी तुडवतात. पण त्यांच्या अभिनयात इतका जोश आहे की स्वतः लोकशाहीचा खून केल्यानंतर ते आपल्या विरोधकांना लोकशाहीचे मारेकरी म्हणतात. म्हणजे तसे ते भासवतात. मग अनंत करमुसेचं प्रकरण असो, टिव्ही डिबेटमध्ये येऊन गुंडगिरीची भाषा असो, थिएटरमध्ये जाऊन रयतेला केलेली मारहाण असो, त्या महिलेला हात लावून जबरदस्ती बाजूला करणे असो. सर्व घटनांमध्ये जितेंद्र आव्हाड लोकशाहीच्या मूल्यांना पायदळी तुडवत आहेत. शाहू-फुले-आंबेडकरांचा अपमान करत आहेत. आणि इतकं करुन सुद्धा ज्यावेळी ते अडचणीत येतात तेव्हा ते मीडियासमोर येऊन बागुलबुवा उभा करतात, खोटे अश्रू ढाळतात, अभिनय करतात. लोकांना हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की मी निष्पाप आहे. जणू लोक या खोट्या अश्रूंना बळी पडणार आहेत.
(हेही वाचा भारत जोडायचा असेल, तर पाकिस्तान आणि बांग्लादेशला सोबत घ्या; राहुल शेवाळे यांचे कॉंग्रेसला आव्हान)
नक्कीच नटसम्राट झाले
तर अशाप्रकारे ते उत्तम अभिनय करतात. इतरांवर आरोप करताना त्यांच्यातली गुंड प्रवृत्ती त्यांच्या नेत्यावर हावी होते आणि स्वतः अडचणीत आल्यावर त्यांच्यातला अभिनेता त्यांच्यातल्या नेत्यावर हावी होतो. म्हणजे ते राजकारणात वावरतात एक बहुरुपी म्हणून. म्हणूनच राजकारणात राहुन जनतेला त्रास देण्याऐवजी ते अभिनयाच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करु शकतात. जर शरद पवारांचा हात पकडून ते राजकारणात आले नसते तर ते नक्कीच नटसम्राट झाले असते. पण जनतेचं दुर्दैव की ते नेते झाले.
Join Our WhatsApp Community