मुंबईत रोजगार मेळाव्याचे आयोजन! ५ हजार ५९० उमेदवारांना नोकरीची संधी, थेट होणार मुलाखती

84

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत येत्या शनिवारी १० डिसेंबर रोजी राणीचा बाग, ईएस पाटनवाला मार्ग, भायखळा (पूर्व) येथे “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, सेवा क्षेत्र यामधील ५ हजार ५९० इतके रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मेळाव्यात कंपन्यांकडून थेट मुलाखती घेतल्या जाणार असून नोकरीइच्छूक उमेदवारांनी मेळाव्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

( हेही वाचा : Gujarat Assembly Election 2022 : भाजपने मोडला काँग्रेसचा ३७ वर्षांचा रेकॉर्ड)

मेळाव्यामध्ये बीव्हीजी इंडिया, आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती, इम्पेरेटीव्ह, हिंदू रोजगार डॉट कॉम, एअरटेल, रोप्पन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस, फास्टट्रॅक मॅनेजमेंट सर्व्हिसेस, अपोलो होम हेल्थकेअर, स्टेलर सिक्युरिटी अँड फॅसिलीटी सर्व्हिसेस इत्यादी उद्योग, कंपन्या सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्नीक, इंजिनीअरींग पदवी इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यामध्ये बँकिग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पीटीलिटी, एचआर, ॲप्रेंटीसशीप, डोमॉस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया अँड एन्टरटेंमेंट अशा विविध क्षेत्रातील पदे उपलब्ध आहेत.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून (आयटीआय) एक किंवा दोन वर्षाचा तांत्रिक अभ्यासक्रम उर्तीण झालेल्या उमेदवारांकरिता नामांकीत कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत अप्रेंटीसशिपची पदेही या मेळाव्यामध्ये भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ इत्यादी महामंडळांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात येणार आहेत. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही मेळाव्यात सहभाग असणार आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राज्यात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून या विविध प्रशिक्षण योजनांची माहितीही मेळाव्यात मिळणार आहे. मेळाव्यामध्ये मुंबई शहर येथील नामांकीत कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच तज्ञांमार्फत उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयरविषयक समुपदेशनही करण्यात येणार आहे. मेळाव्याचे उद्घाटन सकाळी १० वाजता मंत्री श्री. लोढा, शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते तसेच कौशल्य विकास विभागाचे सचिव तथा आयुक्त डॉ. रामास्वामी एन, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह विविध उद्योजकांच्या उपस्थितीत होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.