स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध ठेवले होते. त्यावेळी त्यांनी अस्पृश्य निवारणाचे महान कार्य केले. त्यासाठी त्यांनी भागोशी शेठ किर यांच्या मदतीने पतित पावन मंदिर उभारले आणि त्यामध्ये पूर्वास्पृशांना मंदिरात प्रवेश दिला, त्यांच्यासोबत सह भोजन सुरु केले, हा उपक्रम पुन्हा राबवण्यात आला. यासाठी २४ फेब्रुवारी या दिवसाची निवड करण्यात आली. याच दिवशी ज्येष्ठ समाजसेवक भागोजी शेठ किर यांचा जन्म आणि मृत्यू झाला होता. त्या दिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम करण्यात आला.
जातीव्यवस्था नष्ट करून हिंदू समाजाला संघटित करण्याचा निर्णय
या उपक्रमाविषयी पतित पावन मंदिर विश्वस्त संस्थेचे माजी अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध वकील बाबा पारुळेकर यांनी विस्तृत माहिती दिली. आकाशवाणीच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात वकील बाबा पारूळेकर यांची मुलाखत निवेदिका विभा कदम यांनी घेतली. त्यावेळी बाबा पारुळेकर यांनी हा उपक्रम वीर सावरकर यांनी सुरु करण्यामागे त्यांची काय धारणा होती, त्याचा उहापोह केला. त्यावेळी वकील पारुळेकर म्हणाले, वीर सावरकर यांना जेव्हा रत्नागिरीत स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी सामाजिक कार्य करण्याचा निर्णय घेतला, ज्याअंतर्गत समाजातील जातीव्यवस्था नष्ट करून अवघ्या हिंदू समाजाला संघटित करण्याचे ठरवेल. मात्र त्यासाठी त्यांनी मंदिर व्यवस्थेचा उपयोग केला. मंदिर हे एकमेव ठिकाण आहे, जिथे सर्वांच्या श्रद्धा जोडलेल्या असतात, तिथे संघटन होऊ शकते, मात्र त्यावेळी पूर्वास्पृशांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता, त्यामुळे वीर सावरकर यांनी भागोजी शेठ किर यांच्या मदतीने रत्नागिरीत पतित पावन मंदिर उभारले आणि त्यामध्ये पूर्वास्पृशांना थेट मंदिरात प्रवेश दिला. इतकेच नव्हे तर त्यांच्याशी सह भोजन केले, असे वकील बाबा पारुळेकर म्हणाले.
(हेही वाचा मुंबई आयआयटीला ‘जेएनयू’ची लागण; ‘जय श्रीराम’ म्हणण्यावर आक्षेप)
इतिहासाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न
आज पुन्हा एकदा पतित पावन मंदिरात हे सह भोजन आणि भजन हा उपक्रम सुरु करण्यात आला, असे वकील पारुळेकर म्हणाले. याआधी जेव्हा मंदिराची पुनर्बांधणी केली, तेव्हा आम्ही सहभोजन केले होते. आता इतिहासाचे पुनरुज्जीवन करणे, त्या काळी नक्की काय घडले होते, हे लोकांना समजावे यासाठी त्याचे प्रत्यक्ष प्रेझेंटेशन करण्याच्या हेतूने भागोजी शेठ किर यांचा जन्म आणि मृत्यू एकाच दिवशी झाला, त्यादिवशी पुन्हा एकदा हे सह भोजन करण्यात आले. त्यावेळी वीर सावरकर, भागोजी शेठ किर आणि गाडगे महाराज यांच्या वेशात काही जण होते, त्यावेळी त्यांचे औक्षण करण्यात आले. वीर सावरकर यांनी तेव्हा सह भोजनासाठी १५०-२०० जणांसाठी पाने वाढली होती. तसे पुन्हा एकदा सहभोजन करण्यात आले, असे वकील बाबा पारुळेकर म्हणाले.