मध्य रेल्वेचा जंबो ब्लॉक, रेल्वेची प्रवाशांसाठी ‘विशेष’ सुविधा

मध्य रेल्वेवरील कर्नाक पुलाच्या पाडकामासाठी घेण्यात येणाऱ्या २७ तासांच्या जंबो ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना पुढील प्रवासाचे योग्य ते मार्गदर्शन व्हावे यासाठी रेल्वेच्या वतीने हेल्पडेस्क उभारण्यात आले आहेत. मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, दादर, ठाणे, वडाळा रोड आणि पनवेल स्थानकांवर हेल्पडेस्क सुरू केली आहेत. हे हेल्पडेस्क तिकीट तपासणी कर्मचार्‍यांकडून आरपीएफच्या सहाय्याने चालवले जाणार आहेत. अतिरिक्त आरक्षण तसेच रद्दीकरण काउंटर महत्वाच्या स्थानकांवर उघडले जात आहेत आणि प्रवाशांच्या फायद्यासाठी अतिरिक्त एटीव्हिएम सुविधा मदतनीस सेवेत असतील, असे मध्य रेल्वेने प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

कुठे आहे ब्लाॅक?

कर्नाक पुलाच्या पाडकामासाठी हाती घेण्यात येणाऱ्या २७ तासांच्या जंबो ब्लॉकमध्ये सुमारे ९०० तासांइतके काम केले जाईल.  शॅडो ब्लॉकचे काम नो ट्रेन झोनमध्ये म्हणजे मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा दरम्यान तसेच हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वडाळा रोड दरम्यान केले जाईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -भायखळा विभागात आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वडाळा रोड विभागात अनेक मार्गांवर हे काम केले जाणार आहे.  २७ तासांचा हा ब्लॉक शनिवारी १९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते सोमवारी  २३ नोव्हेंबर मध्य रात्री ०२ वाजेपर्यंत असेल.  या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद दरम्यानच्या सर्व सहा लाईन, ७वी लाईन आणि यार्डवर  सर्व कामे केली जाणार आहेत.

(हेही वाचा हिंदू देवतांची विटंबना करणारे हास्यकलाकार वीर दास, मुनव्वर फारूकीचे कार्यक्रम रद्द!)

हेल्पडेस्क सुरू केले

या कालावधीत प्रवाशांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, दादर, ठाणे, वडाळा रोड आणि पनवेल स्थानकांवर हेल्पडेस्क सुरू केली आहेत. याशिवाय शॉर्ट ओरिजिनेशन/टर्मिनेशन, मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे रीशेड्युलिंग आणि उपनगरीय गाड्यांची माहिती यासंबंधी सतत उद्घोषणा केल्या जात आहेत. ब्लॉकची माहिती आणि त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणात एसएमएसद्वारे आणि मध्य रेल्वेच्या ट्विटर, फेसबुक, कू आणि इंस्टाग्राम सारख्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात आहेत. या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीसाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.  मध्य रेल्वेचे अधिकारी, निरीक्षक आणि अभियंते यांच्या कार्यक्षम टीमच्या देखरेखीखाली हा महत्त्वाचा ब्लॉक पार पाडण्यासाठी प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here