प्रशिक्षण सत्रात गुडघ्याला गंभीर स्वरुपाची अस्थिबंध दुखापत झाल्यानंतर नवोदित महिला कबड्डीपटू पूजा पाटील यांच्यासमोर स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र महानगरपालिकेच्या कांदिवलीतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका रुग्णालयात पूजा पाटील यांच्यावर दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आणि आता या दुखापतीतून पूर्ण सावरल्यानंतर पूजा पाटील यांनी पुन्हा स्पर्धांमध्ये उतरुन खेळाला सुरुवात केली आहे.
नवोदित कबड्डीपटू पूजा पाटील (वय २४ वर्ष) यांना राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी जून २०२२ मध्ये प्रशिक्षण सत्रात सराव करत असताना डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. महानगरपालिकेच्या कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सामान्य रुग्णालयात त्यांनी दुखापतीची गंभीरता जाणून घेण्यासाठी तपासणी केली. दुखापतीचे स्वरुप गंभीर असल्याने स्पष्ट झाल्याने पूजा यांना स्पर्धात्मक खेळासाठी सराव करता येणार नसल्याचे निदर्शनास आले आणि त्यामुळे त्यांची कारकीर्दच जणू संकटात सापडली होती. अशावेळी रुग्णालयातील अस्थितज्ज्ञ डॉ. अमीत धोंड यांच्या नेतृत्वाखालील अस्थिरोगतज्ज्ञांच्या पथकाने विविध चाचण्यांद्वारे तपासणी केली. एमआरआय स्कॅनमधील निदान पाहता, पूजा पाटील यांच्या गुडघ्यावरील अस्थिबंध (लिगामेंट) पूर्णपणे फाटल्याचे निदान झाले. त्यामुळे त्यावर तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज होती.
पूजा पाटील या क्रीडापटू असल्याने व त्यांची भविष्यातील कारकीर्द लक्षात घेता त्यांच्यावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरुन शस्त्रक्रियेचा कमीत कमी त्रास व्हावा आणि त्यानंतर लवकरात लवकर बरे होवून पूजा यांना खेळाला सुरुवात करता यावी. त्याचप्रमाणे, पूजा पाटील या क्रीडापटू असल्याने त्यांच्यासाठी अतिशय दर्जेदार व वैद्यकीय गुणवत्तापूर्ण नवीन अस्थिबंध रोपण करणे आवश्यक होते. या सर्व बाबी लक्षात घेवून त्यानुसार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रतिमा पाटील आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय गुप्ता यांच्या मदतीने पूजा पाटील यांच्या आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली.
(हेही वाचा भारताचा पराभव; एकही विकेट न गमावता ऑस्ट्रेलियाचा विजय, मालिकेत बरोबरी)
यानंतर अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अमीत धोंड, डॉ. सौरभ मुनी आणि डॉ. स्वप्नील शाह यांच्यासह रुग्णालयातील अस्थिरोग उपचार पथकाने अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या सहाय्याने आर्थ्रोस्कोपिक (की-होल) शस्त्रक्रिया केली. भूलतज्ज्ञांच्या पथकाचे नेतृत्व डीएनबी शिक्षक डॉ. राजेश त्रिमुखे आणि डॉ. परब यांनी केले. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने पूजा पाटील यांना अतिशय आनंद झाला, त्याचप्रमाणे एका युवा नवोदित कबड्डीपटूची कारकीर्द सुरळीत राहील, याचे वैद्यकीय पथकालाही समाधान लाभले. विशेष म्हणजे अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये जिथे सुमारे दीड लाख रुपयांचा खर्च होवू शकला असता, तिथे अत्यल्प खर्चामध्ये महानगरपालिका रुग्णालयात ही दर्जेदार शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर कठोर वैद्यकीय उपचारांचा पाठपुरावा, भौतिक उपचार व व्यायाम (फिजिओथेरपी) यांच्या आधारे दुखापतीतून पूर्णपणे बरे होवून पूजा पाटील यांनी आता राज्यस्तरीय स्पर्धा पुन्हा जोमाने सुरू केल्या आहेत. महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये डीएनबी अभ्यासक्रम सुरु झाल्यानंतर अशा स्वरुपाच्या महत्त्वाच्या शस्त्रक्रिया आता उपनगरीय रुग्णालयांमध्ये होवू लागल्या असून त्याचा फायदा शेकडो रुग्णांना होतो आहे. पूर्वी अशा प्रकारच्या रुग्णांना वैद्यकीय महाविद्यालयांकडे पाठवावे लागत होते. मात्र उपनगरीय रुग्णालयांमधील अद्ययावत सोयीने आता मोठ्या रुग्णालयांवरील ताण देखील कमी होवू लागला आहे, अशी प्रतिक्रिया प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली.