नाशिक पंचवटीतील प्रसिध्द श्री काळाराम मंदिरात कोल्हापूर येथील छत्रपती घराण्यातील संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगिताराजे यांचा पूजा विधीवरून महंत सुधीरदास पुजारी यांच्याशी वाद झाल्याचे संयोगिताराजे यांच्या ३० मार्च रोजीच्या पोस्टवरून समोर आले. यासंदर्भात महंत सुधीरदास यांनी हा प्रकार गैरसमजातून झाल्याचे सांगितले. तसेच ज्या पुराणोक्त शब्दावरून वाद झाला, तो शब्दप्रयोग संकल्प घेताना सर्वत्र वापरला जातो, त्यात गैर असे काही नाही, अशी भूमिका मांडली. तरीही या प्रकरणात छत्रपती घराण्याचा अनादर होत असल्यास आपण दिलगिरी व्यक्त करतो, लवकरच कोल्हापूर येथे थोरले शाहू महाराज यांची भेट घेऊन याबाबत त्यांच्यासमोर निवेदन करणार असल्याचेही महंत सुधीरदास महाराज म्हणाले.
शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेल्या पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात राज्यासह देश-विदेशातील भाविक दर्शनासाठी येत असतात. याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला आहे. मंदिरात दीड महिन्यांपूर्वी संयोगिताराजे या पूजाविधीसाठी आल्या होत्या. त्यावेळी मंदिरात पूजेवरुन झालेल्या वादाविषयी त्यांनी समाज माध्यमाव्दारे माहिती दिल्यानंतर खळबळ उडाली. त्यावर महंत सुधीरदास महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर भूमिका मांडली.
(हेही वाचा छत्रपती संभाजीनगर, मालवणीत दंगल…राज ठाकरेंनी आधीचे केलेले सावध; व्हिडिओ व्हायरल )
काय म्हणाले महंत?
संयोगिताराजे यांनी अभिषेक संकल्प करण्यास सांगितले होते. तो वेदोक्त असायला हवा, असेही त्यांनी सांगितले होते. यावर प्रभुरामचंद्रांना वेदोक्तच पूजा अभिषेक केला जातो, असे स्पष्ट केले होते. संकल्प सांगताना श्रुती, स्मृती, पुराणोक्त असे म्हटल्यावर राणी साहेबांनी पुराणोक्त शब्दप्रयोगाला आक्षेप घेतला. संकल्प करताना त्यात वेदोक्त आणि पुराणोक्त असे काही नसते, असे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. छत्रपती घराण्याबाबत काळाराम मंदिरातील पुजारी घराण्याला नितांत आदर आहे. वेदोक्त पूजेचा अधिकार नसल्याचे आपण बोललो नाही. छत्रपती घराण्याचा अनादर होत असल्यास आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे महंत सुधीरदास यांनी म्हटले आहे. छत्रपती घराणे आणि मंदिराचे पुजारी घराणे यांचे कित्येक पिढ्यांचे संबंध आहेत. वेदोक्त पूजा छत्रपती घराण्याचा अधिकार आहे. उपरोक्त प्रकार गैरसमजातून झाला असावा. कोल्हापूर येथे मोठ्या महाराजांची भेट घेऊन लवकरच गैरसमज दूर केले जातील. संयोगिताराजे या पावणेदोन महिन्यांपूर्वी पूजाविधी करण्यासाठी मंदिरात आल्या होत्या. त्यांनी प्रसाद स्वीकारून दक्षिणाही दिली होती.
Join Our WhatsApp Community