रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांना थंडगार पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मध्य रेल्वेनेचार वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत सुरू केलेली जनजल योजना बंद पडली आहे. इंडियन कॅटिरग अॅन्ड कॉर्पोरेशनच्या सहकार्याने मध्य रेल्वे मार्गावर जन जल योजनेसाठी चौक्या उभारण्यात आल्या होत्या. अल्प दरात या ठिकाणी प्रवाशांना पाणी उपलब्ध होत होते. करोना महासाथीच्या काळात ही योजना बंद पडली. आणि त्यानंतर ती आजपर्यंत बंद अवस्थेतच आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे.(Railway Water Vending Machine)
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नऊ रेल्वे स्थानकांमधील जनजल योजनेच्या चौक्या पूर्णपणे बंद आहेत. या चौक्यांचा आधार घेऊन भटकी कुत्री, भिकारी बसलेले असतात. जनजल योजनेतून पाणी घेण्यासाठी प्रवाशाने नाणे मशीन मध्ये टाकले की प्रवाशाला पाणी मिळत होते. तसेच, योजनेतील तिकीट खिडकीजवळ बसलेली महिला प्रवाशांना पाणी विक्री करण्याचे काम करत होती.
३०० मिलिलिटरचे साधे पाणी एक रुपया, थंड पाणी दोन रुपये, ५०० मिलिलिटरचे पाणी तीन रुपये, पाच रुपये, एक लिटर पाणी पाच रुपये, ८ रुपये, दोन लिटर पाणी आठ रुपये, १२ रुपये, पाच लिटर पाणी २० रुपये, २५ रुपये दराने विकले जात होते. २४ तास ही सेवा फलाटावर असल्याने मेल, एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फलाटावर गाडी थांबली की तात्काळ जनजल योजनेतून मुबलक पाणी खरेदी करणे शक्य होत होते. ही योजना बंद असल्याने प्रवाशांना फलाटावरील नळावर जावे लागते. या पाण्याच्या शुद्धतेविषयी कायम प्रश्न असतातच. अनेक ठिकाणच्या नळांची चोरी झाली आहे.
(हेही वाचा : Special Railway: दिवाळीच्या मुहूर्तावर कोल्हापूर-पुणे मार्गावर ‘ही’ विशेष रेल्वे सुरू)
रेल्वे स्थानकातील जुनाट जलशीत संयंत्रे बिघडली आहेत. त्यांची देखभाल केली जात नसल्याने या संयत्रांच्या भोवती घाण असल्याने कोणी प्रवासी या ठिकाणी पाणी पिण्यास येत नाही. अशी भयावह परिस्थिती सध्या कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी, शहाड, आंबिवली, टिटवाळा, कोपर, ठाकुर्ली, मुंब्रा, दिवा स्थानकांमधील फलाटावर पाहण्यास मिळते. उन्हाचे दिवस असल्याने फलाटावर उतरल्यावर प्रवाशांना पाण्यासाठी फलाटावर वणवण करावी लागत आहे. अन्यथा फलाटावरील उपाहारगृह चालकाकडून पाणी खरेदी करावे लागते.
ज्या मशिन बंद अवस्थेत आहेत त्या काढून टाकणार आहेत. नवीन कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे नवीन मशिन बसविण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे बंद मशीन च्या जागी लवकरच नवीन मशीन बसवली जातील.
डॉ .शिवाजी मानसपुरे, मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी