राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राज्याचे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर वर्णी लावण्यासाठी अनेक सरकारी वकिलांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मात्र, कंगणा रणौतचा खटला लढवणारे वीरेंद्र सराफ कुंभकोणी यांची जागा घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
वरिष्ठ सरकारी वकील असलेले अॅड. वीरेंद्र सराफ मुंबई बार असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रणौतच्या अनधिकृत घराचे अतिक्रमण काढल्यानंतर तिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी कंगनाची केस अॅड. सराफ यांनी लढवली होती.
उद्धव ठाकरेंनी नाकारला होता राजीनामा
- आशुतोष कुंभकोणी यांची महाअधिवक्ता म्हणून नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात करण्यात आली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर कुंभकोणी यांनी राजीनामा दिला होता. घरगुती कारणामुळे आपल्याला जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती त्यांनी राज्य सरकारला केली होती.
- मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो नाकारला होता. आता सरकार बदलल्यानंतर मंत्रिमंडळाने त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ महाअधिवक्ता म्हणून काम करणारे ते तिसरे महाअधिवक्ता ठरले आहेत. एच. एम. सीरवाई यांनी १७ वर्षे महाधिवक्ता म्हणून काम केले होते, तर रवी कदम यांनी ७ वर्षे काम केलेले आहे.