कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउण्डमधून एवढा किलो कचरा जातो थेट समुद्रात

तिन्ही बाजूने डम्पिंग ग्राउण्डने वेढलेल्या ठाणे खाडी रामसर क्षेत्रात केवळ कांजूरमार्ग येथील पालिकेच्या डम्पिंग ग्राउण्डमधून दर दिवसाला ५ हजार किलो विघटन न होणारा कचरा टाकला जात असल्याची भीती पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली. गेल्या आठवड्यापासून वनशक्ती या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या पुढाकाराने डम्पिंग ग्राउण्डमधील तीन जागांवर जाळी टाकण्यात आली आहे. पाण्याच्या प्रवाहातून थेट ठाणे खाडीत जाणारा कचरा रोखण्यासाठी ही कल्पना आखण्यात आली आहे. यासह ऐरोली, कळवा तसेच वाशी येथील ब्रीजवरही मोठ्या उंचीच्या जाळ्या लावल्यास निर्माल्य ठाणे खाडीत जाणार नाही, अशी मागणीही करण्यात येत आहे. ब्रीजवर उंच जाळ्या बांधण्याबाबत आम्ही सकारात्मक असल्याची माहिती कांदळवन कक्षाच्या अधिका-यांनी दिली.

कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउण्डमधील कचरा थेट ठाणे खाडीतील खारफुटींमध्ये येत असल्याने येथील जैवविविधता धोक्यात आली आहे. गेल्या आठवड्यात कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउण्डमधून न विघटन होणारा कचरा रोखण्यासाठी तीन ठिकाणी जाळी बसवण्यात आल्या. यावेळी वनाधिकारी तसेच पालिका अधिकारीही उपस्थित होते. खाडीतील वाढत्या जलप्रदूषणात ऑक्सिजनची मात्रा घटल्याने पूर्वीप्रमाणे ब-याचशा माशांच्या प्रजाती खाडी परिसरातून नाहीशा झाल्या आहेत. वाढत्या जलप्रदूषणामुळे भांडूप परिसरात मासेमारी करणा-या स्थानिक मच्छिमारांना मोठा फटका बसला आहे. वाढत्या जलप्रदूषणामुळे ठाणे खाडीतील जैवविविधतेवर झालेल्या परिणामाबाबत कांदळवन कक्षाने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएसएस) या पर्यावरणप्रेमी संस्थेला सर्व्हेक्षण करण्यासाठी करार केला आहे.

या माशांच्या प्रजाती नष्ट झाल्या –

  • जिताडा
  • करपाल (कोळंबीची प्रजाती)
  • खेकड्यांच्या असंख्य प्रजाती
  • करकरी
  • वडा
  • घावी
  • निवटी

    कच-याचे विघटन आणि ओला व सुका कच-याचे विलगीकरण होणे आवश्यक आहे. ठाणे खाडीत जाणा-या कच-याबाबत आम्ही येत्या चार आठवड्यात तपशीलवार अहवाल सादर करु.-स्टॅलिन दयानंद, प्रकल्प संचालक, वनशक्ती

डम्पिंगमधून येणारा कचरा रोखण्यासाठी जाळे लावणे ही संकल्पना वनशक्ती या संस्थेची आहे. जलप्रदूषणामुळे मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. ठाणे खाडीतील जलप्रदूषण कमी व्हावे यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. जलप्रदूषणाला रोखण्यासाठी वनशक्तीकडून होणा-या प्रयत्नासाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत. ठाणे खाडीला रामसर दर्जा मिळाल्याने आता जलप्रदूषण रोखण्यासाठी सरकार गांभीर्यतेने पावले उचलतील याबाबत आम्ही आशावादी आहोत. नंदकुमार पवार, अध्यक्ष, महाराष्ट्र लघुउद्योग पारंपरिक मच्छिमार संघटना

ठाणे खाडीत ब्रिजवरुन माणसे निर्माल्य टाकतात. निर्माल्य तलावात टाकण्यासापासून रोखण्यासाठी ऐरोली, वाशी तसेच ठाणे ब्रीजवर मोठ्या उंचीच्या जाळ्या लावता येतील
अविनाश भगत, पक्षीअभ्यासक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here