दक्षिण कोकणात रविवारी मुसळधार पाऊस पडला. कणकवलीत गेल्या २४ तासांत १०९ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती सोमवारी सकाळी साडेआठच्या नोंदणी पत्रातून मिळाली. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, सोमवारी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे, अहमदनगर आणि साता-यात मुसळधार पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
( हेही वाचा : अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार; मुरजी पटेल अर्ज मागे घेणार )
मध्य महाराष्ट्रासह सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात आता परतीचा पाऊस सुरू आहे. लातूर, उस्मानाबाद आणि कोल्हापूरात परतीच्या संततधार पाऊस सुरु आहे. उस्मानाबादमधील लोहारा येथे ३८ तर कळंब येथे ४४ मिमी पावसाची नोंद झाली. बीड, सातारा, अहमदनगर, जालना आणि अहमदनगरमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी परतीच्या पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. दोडामार्ग येथे ६० मिमी, मुळदे अग्री येथे ८० मिमी, देवगड येथे ५० मिमी पावसाची नोंद झाली.
सोमवारी कोकणातील उर्वरित भागांत तसेच मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. विदर्भात परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत असून, येत्या दोन ते तीन दिवसांत पाऊस माघारी फिरण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
Join Our WhatsApp Community