महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावाद सर्वज्ञात आहेच. त्यामुळे आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकातील मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून ‘कित्तूर कर्नाटक’ असे करण्यात आले असल्याचं घोषित केलं आहे. सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कर्नाटकचे कायदा आणि विधिमंडळ कामकाज मंत्री जेसी मधुस्वामी यांनी ही माहिती दिली. कर्नाटकचा महाराष्ट्राशी सीमावाद आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकार हे पाऊल उचलत आहे.
म्हणून बदलले नाव
कर्नाटक राज्याची निर्मिती झाल्यानंतरही आजही या भागाची ओळख ‘मुंबई कर्नाटक’ म्हणून कायम होती. यामुळेच ही ओळख पुसण्याकरता कर्नाटक सरकारने मुंबई कर्नाटक भागाचे नामांतर ‘कित्तुर कर्नाटक’ असे केले आहे. नामांतर करण्याबाबतची प्रशासयकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कर्नाटक सरकारने आज नामांतरणाची घोषणा केली. याआधी ‘हैद्राबाद कर्नाटक’ प्रांताचे नामाकरण ‘कल्याणा कर्नाटक’ असे करण्यात आले होते.
(हेही वाचा – पगाराच्या आंदोलनात ‘नोकरी’ही गेली; राज्यात ‘या’ आगारातील ३७६ कर्मचारी निलंबित)
मुंबई प्रांतात या भागांचा होता समावेश
स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारतात इंग्रज राज्य असताना संस्थानांचा भाग वगळता प्रशासकीय सोईकरता, कारभाराकरिता प्रातांची निर्मिती इंग्रजांनी केली होती. यामध्ये बॉम्बे, बंगाल, मद्रास, पंजाब असे विविध प्रांत होते.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर १९५६ नंतर भाषेवर आधारित विविध राज्यांची निर्मिती देशामध्ये करण्यात आली. म्हैसूर या राज्याची निर्मिती कन्नड भाषिकांसाठी झाली होती. नंतर १९७३ ला या राज्याचे नामकरण कर्नाटक असे करण्यात आले. स्वातंत्र्यापूर्वी मुंबई प्रांतात बेळगाव, कारवार, धारवाड आणि विजापूर या भागांचा समावेश होता.