कस्तुरबा रुग्णालयात आता नवीन सुसज्ज लॅब

मुंबईतील पहिले डायग्नोस्टिक केंद्र(पीसीआर लॅब)हे कस्तुरबा रुग्णालयात सुरू करण्यात आले होते.

कस्तुरबा रुग्णालयातील क्लिनिकल लॅब, मायक्रोबायोलॉजी लॅब आणि बायोकेमिस्ट्री या तीन प्रयोगशाळा असलेली इमारत धोकादायक बनल्याने या इमारतीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. परंतु इमारतीच्या दुरुस्तीचे काम केल्यास लॅब अन्यत्र हलवावी लागणार आहे. त्यामुळे आता ही लॅब नवीन वास्तूत निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लॅबच्या निर्माणावर कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहेत.

५१५ रुग्ण खाटांची सोय

मुंबई महानगरपालिकेचे कस्तुरबा रुग्णालय हे मुंबईतील एकमेव संसर्गजन्य रोगाचे रुग्णालय आहे. या रुग्णालयात मुंबईसह मुंबई बाहेरील रुग्ण उपचाराकरिता दाखल होत असतात. या रुग्णालयामध्ये एकूण ५१५ रुग्ण खाटांची सोय असून उपचाराकरिता भाजलेल्या रुग्णांचा स्वतंत्र कक्ष सन १९९२ पासून सूरु करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सन २००९ पासून स्वाईन फ्ल्यू रोगाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यामुळे स्वाईन फ्ल्यू रुग्णांच्या उपचाराकरिता दोन स्वतंत्र कक्ष सूरु करण्यात आलेले आहेत.

(हेही वाचा : पवईतील सायकल ट्रॅकच्या बांधकामाला उच्च न्यायालयाची स्थगिती)

मुंबईतील पहिले डायग्नोस्टिक केंद्र

कोविड १९ च्या साथीच्या काळात कस्तुरबा रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली गेली. तेव्हापासून आजतागायत कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मुंबईतील पहिले डायग्नोस्टिक केंद्र(पीसीआर लॅब)हे कस्तुरबा रुग्णालयात सुरू करण्यात आले होते. कोविड – १९ व्यतिरिक्त, या हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल लॅबसह स्वतंत्र प्रयोगशाळा इमारत आहे. मायक्रोबायोलॉजी लॅब आणि बायोकेमिस्ट्री लॅब ज्यामध्ये विविध प्रकारच्या संसर्गजन्य रोगांसाठी मूत्र, मल आणि रक्तांच्या नमुन्यांची नियमित तपासणी केली जाते. तसेच रुग्णालयामध्ये क्लिनिकल लॅब, मायक्रोबायोलॉजी लॅब आणि बायोकेमिस्ट्री अशा तीन प्रयोगशाळा या एकाच इमारतीत आहेत. प्रयोगशाळेच्या या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आल्यानंतर या इमारतीच्या मोठ्या दुरुतीची गरज असल्याचे दिसून आले. परंतु मोठ्या दुरुस्तीची गरज असली तरी अद्याप त्याला मंजुरी देण्यात आली नाही.

लॅबसाठी स्वतंत्र व्यवस्था

कोविड रूग्णांच्या नमुन्याची नियमितपणे तपासणी होत असल्यामुळे क्लिनिकल लॅब, मायक्रोबायोलॉजी लॅब आणि बायोकेमिस्ट्री लॅब त्यांचे उपक्रम थांबवणे शक्य नाही. परंतु जेव्हा प्रयोगशाळा इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु केल्यास प्रयोगशाळेची इमारत रिकामी करून अन्य जागेत स्थलांतरित करावी लागेल. त्यामुळे लॅब स्थलांतरित करताना त्या बंद ठेवाव्या लागतील. याचा परिणाम रुग्णांच्या आजाराचे निदान करण्यावर होईल. त्यामुळे आवश्यक सेवा सुविधांसह नवीन लॅब बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रयोग शाळेत वापरली जाणारी यंत्रे, उपकरणे ही ५०० ते १२०० किलो वजनासारखी जड असून इमारतीच्या जिन्यावरून ही उपकरणे नेणे जिकरीचे असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. क्लिनिकल लॅब, मायक्रोबायोलॉजी लॅब आणि बायोकेमिस्ट्री लॅबसाठी डायग्नोस्टिक सर्व्हिसेस नवीन ठिकाणी स्थापन केल्यास ही लॅब आवश्यक सेवा सुविधांसह परिपूर्ण होऊ शकेल. ज्यामुळे जुन्या प्रयोगशाळेच्या इमारतीत परत स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे कस्तुरबातील नवीन जागेत ही लॅब उभारण्यात येणार आहे. यासाठी विघ्नहर्ता कॉर्पोरेशन या कंपनीची निवड झाली असून यावर ७८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here