पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील एमसीए या आंतरराष्ट्रीय स्टेडीयममध्ये भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये क्रिकेट सामना सुरु असताना स्टेडीयम जवळील एका उंच इमारतीवरून सामन्यावर दुर्बिणीने वॉच ठेवून सट्टा लावला जात होता. असा धक्कादायक प्रकार पुणे पोलिसांना समजताच त्यांनी या टोळीला ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण ३३ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
… आणि मिळाली आणखी धक्कादायक माहिती!
अशा प्रकारे स्टेडीयमच्या जवळ असलेल्या उंच इमारतीवरून सुरु असलेल्या सामन्याची दुर्बिणीद्वारे रेकी केली जात आहे आणि त्याआधारे सट्टा खेळला जात आहे, अशी धक्कादायक माहिती पुणे पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाड टाकली. त्या ठिकाणाहून काही जणांना ताब्यात घेतले. त्यांची तिथेच चौकशी केल्यावर आणखी धक्कादायक माहिती मिळाली. त्यांचे काही साथीदार हे स्टेडीयमच्या समोरील टेकडीवर बसून सामन्याची रेकी करत होते, तर काही जण एका आलिशान हॉटेलात बसून सट्टा चालवत होते. पोलिसांनी तात्काळ त्या त्या भागात धाडी टाकून त्या सर्वांना ताब्यात घेतले.
(हेही वाचा : पुण्यातील आग विझवून जाताना अग्निशमन दलाचा अधिकाऱ्याचा मृत्यू!)
४५ लाखांचा मुद्देमाल जप्त!
पोलिसांनी तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यातून एकूण ३३ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच ७४ मोबाईल फोन, ३ लॅपटॉप, १ टॅब मोबाईल, ८ हाय रेजुलेशनच्या दुर्बिणी, फोटो कॅमेरा, ४ स्पीकर, १ लाख २६ हजार ४३० रुपये रोकड, २८ हजार ८०० रुपयांचे विदेशी चलन आणि १ गाडी असा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांवर हल्ला करण्याचा केला प्रयत्न!
पोलीस सध्या वेशात घटनास्थळी पोहचले. त्यांनी तेथील सट्टाबाजांची माहिती घेतली आणि त्यानंतर त्यांना अटक केली. यावेळी सट्टाबाजांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात कलम ३५३ अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community