परळमधील केईएमच्या बहुमजली इमारतीसह इतर रुग्णालयाच्या इमारतीमधील लिफ्ट मागील काही महिन्यांपासून अचानक बंद पडत असून आयुर्मान संपलेल्या या लिफ्ट आता बदलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे बहुमजली इमारतींसह जुनी अस्थिव्यंग आणि सीव्हीटीसी इमारत आदी ठिकाणी १५ प्रवासी क्षमता असलेल्या १३ लिफ्ट बदलण्यात येणार आहेत.
( हेही वाचा : मुंबई पोलीस दलात मोठा फेरबदल; उपायुक्तांच्या नियुक्त्या)
केईएम रुग्णालयाच्या बहुमजली, जुनी इमारत, अस्थिव्यंग इमारत आणि सीव्हीटीसी इमारत येथे अस्तित्वात असलेल्या लिफ्ट काढून त्याठिकाणी १३ नग प्रवासी-रुग्ण वाहक लिफ्ट बसवून कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये जॉन्सन लिफ्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली आहे. या लिफ्टच्या खरेदीसह ते बसवणे आणि तीन वर्षांच्या हमी कालावधीनंतर पुढील देखभालीसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी मागवलेल्या या निविदेत जॉन्सन लिफ्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला पाच कोटी २१ लाख ०४ हजार ४४६ रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.
केईएम रुग्णालयातील यासर्व इमारतीतील लिफ्ट या २५ वर्षे अधिक जुन्या असून यासाठी सतत दुरुस्ती करावी लागते. त्यासाठी लागणारे सुट्टे भाग खुल्या बाजारात व मूळ उत्पादकांकडे सहजपणे उपलब्ध होत नसल्याने तसेच लिफ्टचे आयुष्यमान संपुष्टात आलेले आहेत. म्हणून यासर्व लिफ्ट बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे यांत्रिकी व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community