केईएम रुग्णालयातील रुग्णाला रस्त्यावर सोडले! दोन कंत्राटी कामगारांची हकालपट्टी!

केईएम रुग्णालयाच्या वैद्यकीय परंपरेमध्ये कोणताही गैरप्रकार सहन केला जात नाही आणि यापुढे देखील केला जाणार नाही. कर्तव्यात कसूर करणाऱ्या व्यक्तीला योग्य त्या प्रशासकीय कार्यवाहीला सामोरे जावे लागते, असे रुग्णालय प्रशासनाने म्हटले.

101

मुंबईतील परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात एका वृद्ध रुग्णावर उपचार न करता त्यास पादचारी मार्गावर सोडून दिल्याचे दर्शवणारी दृक-श्राव्य चित्रफित (व्हिडिओ) समाज माध्यमांमधून प्रसारित होत आहे. यासंदर्भात स्पष्ट करण्यात येते की, या रुग्णाच्या उपचारांमध्ये रुग्णालय प्रशासनाने कोणतीही हेळसांड केलेली नाही. तथापि, सदर रुग्णास प्रवेशद्वाराबाहेर नेऊन सोडणाऱ्या दोन कंत्राटी बहुउद्देशीय आरोग्य कामगारांची रुग्णालय प्रशासनाने सेवेतून हकालपट्टी केली आहे.

‘तो’ रुग्ण अनोळखी!

समाजमाध्यमातून प्रसारित होत असलेल्या चित्रफितीत दिसत असणारा रुग्ण हा अनोळखी व्यक्ती असून त्यास उपचारार्थ केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी, ७ मे, रात्री ११ वाजता कक्ष क्रमांक ४-अ मधील निवासी डॉक्टरांच्या देखरेखीखाली असलेला हा रुग्ण पोटदुखीने त्रस्त झाल्याने त्यास शस्त्रक्रिया तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी नवीन इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या ईएसआरमध्ये पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी दोन बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांना सोबत पाठविण्यात आले. मात्र काही कालावधीने एका नागरिकाने ही घटना चित्रीत करून सदर रुग्ण प्रवेशद्वार क्रमांक ६ बाहेर आणून सोडला असल्याची बाब रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी तात्काळ या रुग्णास कक्ष क्रमांक ४-अ मध्ये पुन्हा दाखल करून त्याच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले. हा रुग्ण अनोळखी असून त्याच्यावर योग्य उपचार करण्यात येत आहेत. उपचारांमध्ये कोणतीही हेळसांड केलेली नाही.

(हेही वाचा : ऑक्सिजन वितरणासाठी नॅशनल टास्क फोर्स बनवा! सर्वोच्च न्यायालयाचा आदेश )

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरणाच्या माध्यमातून शोध काढला!

निर्देशित केलेल्या ठिकाणी न जाता हा रुग्ण प्रवेशद्वाराबाहेर कसा गेला, हे जाणून घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण पाहिले. त्यात आढळले की, सदर रुग्ण शवागाराच्या पॅसेजमधून प्रवेशद्वार क्रमांक ६ च्या बाहेर नेवून तेथे सोडून देण्यात आले. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी संबंधित दोन कंत्राटी बहुउद्देशीय आरोग्य कामगारांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांची रूग्णालय सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. केइएम रुग्णालयामध्ये कोविड-१९ संसर्गाने बाधित हजारो रूग्णांवर उपचार होत असताना दुसऱ्या बाजूला अज्ञात/अनोळखी रुग्ण देखील दाखल होत असतात. गत वर्षभरात कोविड बाधित सुमारे साडे सहा हजार पेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी तर प्रसंगी अनेक रुग्ण अत्यवस्थ स्थितीत दाखल करण्यात आले. कोविड व्यतिरिक्त इतर आजारांचे देखील शेकडो रुग्ण दाखल होत असतात. केईएम रुग्णालयाच्या श्रेष्ठ वैद्यकीय परंपरेनुसार रुग्णांची सर्वथा योग्य ती देखभाल करून प्रत्येक रुग्णावर आवश्यक ते उपचार अथकपणे करण्यात येत आहेत. केईएम रुग्णालयाच्या वैद्यकीय परंपरेमध्ये कोणताही गैरप्रकार सहन केला जात नाही आणि यापुढे देखील केला जाणार नाही. कर्तव्यात कसूर करणाऱ्या व्यक्तीला योग्य त्या प्रशासकीय कार्यवाहीला सामोरे जावे लागते. समाज माध्यमातून प्रसारित होत असलेल्या चित्रफीत बाबत वस्तुस्थिती सर्वांना कळावी म्हणून हे स्पष्टीकरण देण्यात येत आहे, असे रुग्णालय प्रशासनाने म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.