परळ येथील मुंबई महानगर पालिकेच्या केईएम रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरु केली जाणार असल्याची घोषणा रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी केली. मुंबईत खासगी रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा खर्च वीस ते पंचवीस लाखांपेक्षाही जास्त आकारला जात असताना पालिका रुग्णालयात कमी खर्चात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया उपलब्ध होईल.
बुधवारी राष्ट्रीय अवयवदान निमित्ताने केईएम रुग्णालयात अवयवदान जनजागृतीपर कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यावेळी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी ही घोषणा केली. या सुविधेसाठी आवश्यक साधनसामग्रीबाबत माहिती घेण्यासाठी पालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी नुकतीच केईएम रुग्णालय प्रशासनासह बैठक घेतली. शस्त्रक्रिया विभाग, वैद्यकीय उपकरणे तसेच आवश्यक मनुष्यबळ याबाबत डॉ. शिंदे यांनी अधिष्ठाता डॉ. रावत यांच्याकडून माहिती घेतली.
(हेही वाचा ATS : एटीएसकडून पाचवी अटक; झुल्फिकारचा ताबा आता एटीएसकडे)
मुंबईतल्या पहिल्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची नोंद केईएममध्ये 1968 साली पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
मुंबईत 1968 साली परळ येथील केईएम रुग्णालयात पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. मात्र ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अयशस्वी ठरली. त्यानंतर केईएम रुग्णालयात आता हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
मुंबईत 58 रुग्ण नव्या हृदयाच्या प्रतीक्षेत
मुंबईत खासगी रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. मात्र मागणी तेवढा पुरवठा होत नाही. समाजात हृदय प्रत्यारोपणाबाबत बऱ्याच अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे मृत्यूपश्चात नातेवाईक हृदयदान करण्यास तयार होत नाही, अशी माहिती अवयवदान चळवळीतील कार्यकर्त्यांनी दिली.
Join Our WhatsApp Community