राज्यातील शिक्षण विभागात लवकरच केरळ पॅटर्न राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी इयत्ता तिसरीपासून सराव परीक्षा सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील वर्गांच्या परीक्षा घेण्यात येतील. महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. ज्या राज्यांनी शिक्षणात प्रगती केली आहे त्या राज्यांचे धोरण तेथील शैक्षणिक पॅटर्न महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये राबविण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
( हेही वाचा : ‘बाणगंगा’ परिसर मुंबईतील नवे पर्यटनस्थळ; पहा सुंदर फोटो )
यामध्ये केरळ पॅटर्नमध्ये विशेष काम केले जाईल, सोबतच राजस्थान आणि पंजाबमधील मॉडेलचा विचारही केला जाईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
पहिली ते आठवीच्या मुलांना नापास न करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी गांभीर्याने परीक्षेला सामोरे जात नाहीत. त्यामुळे तिसरीपासून सराव परीक्षा अशा प्रकारचा पॅटर्न राबल्यानंतर शिक्षणासोबत कला, विज्ञान विषयाच्या गुणवत्तेत वाढ होईल असा विश्वास शिक्षण विभागाला आहे.
केरळ शैक्षणिक पॅटर्न कसा आहे?
- केरळ पॅटर्नमध्ये प्राथमिक शाळा चालवण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना आणि माध्यमिक शाळा चालवण्याचे अधिकार हे जिल्हा परिषदेला आहेत. प्रत्येक महिन्यात विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेतली जाते. कमी गुण मिळाल्यास पुन्हा सराव परीक्षा घेतली जाते.
- दर दहा वर्षांनी अभ्यासक्रमात बदल केला जातो.
- कला विज्ञान मेळावे घेतले जातात, प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक व पालकांचे असोसिएशन आहे.
- मातृभाषेतील शिक्षणाला विशेष प्रोत्साहन दिले जाते.