राज्यात थंडीची लाट ओसरणार, ‘या’ भागांत किमान तापमान ३.१ अंश सेल्सिअसवर

राज्यात थंडीच्या लाटेचा जोर वाढल्याने मंगळवारी राज्यभरातील बहुतांश भागांत किमान तापमान दहा अंशाखाली गेले. नाशिक, नंदूरबार, जळगाव, धुळे आणि पुण्यातील थंडीची लाट आता ओसरत असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक सुनील कांबळे यांनी दिली. बुधवारपासून राज्यभरात थंडी कमी झाली असेल. मंगळवारी राज्यातील सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथील खेडगाव येथे नोंदवले गेले. खेडगाव येथील किमान तापमानाची नोंद ३.१ अंश सेल्सिअसवर नोंदवली गेली.

गेल्या तीन दिवसांपासून मध्य महाराष्ट्रात थंडीमुळे चांगलाच गारठा अनुभवायला मिळत आहे. स्वेटर आणि कानटोपी परिधान करुनच माणसे घराबाहेर पडत आहेत. थंडीचा प्रभाव वाढत असल्याने उत्तर मध्य महाराष्ट्राला तीव्र थंडीच्या लाटेचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला होता. सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी थंडीच्या लाटेचा प्रभाव दिसून आल्याने सायंकाळनंतर जागोजागी माणसे शेकोट्या पेटवत होती. मराठवाड्यातील काही भागांतही थंडीचा प्रभाव दिसून आला. त्यातुलनेत विदर्भातील किमान तापमानात थोडी घट झाल्याचे दिसून आले. थंडी वाहून नेणारे वारे उत्तर मध्य महाराष्ट्रात सक्रीय होते. परिणामी, कोकणातील किमान तापमानात फारशी घट दिसून आली नाही. बुधवारी राज्यातील किमान तापमान सरासरीएवढेच दिसून येईल. पाच अंशाने कमी नोंदवल्या जाणा-या भागांत किमान तापमान बुधवारी दोन-तीन अंशाने वाढलेले दिसून येईल.

हवामान अभ्यासक शिवकुमार मोगल यांनी नोंदवलेले नाशिक येथील किमान तापमान (अंश सेल्सिअस)

 • खेडगाव- ३.१
 • खडक-सुकेणे – ३.४
 • पिंपळगाव बसवंत – ३.९
 • कुंदेवाडी – ४
 • तपोवन – ४.५
 • निफाड – ५
 • तळेगाव वाणी – ५.१
 • मावडी – ५.३
 • रूई – ५.९

वेधशाळेच्या नोंदीतील मंगळवारी दहा अंशाखाली नोंदवलेले किमान तापमान (अंश सेल्सिअस)

 • परभणी – ६.४
 • औरंगाबाद – ७.७
 • नांदेड – १०.६
 • पुणे – ७.४
 • जळगाव – ५.३
 • नाशिक – ७.६
 • बारामती – ८.३
 • सातारा – १०
 • धुळे – ५.५
 • यवतमाळ – ९.५
 • नागपूर – ९.२
 • भंडारा – ८.९
 • गडचिरोली – ९.२
 • गोंदिया – ८.६

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here