केंद्र व राज्य मत्स्यव्यवसाय विभागाने मत्स्य शेतकरी समृद्ध होण्यासाठी व मत्स्य व्यवसाय वाढीसाठी बँकेच्या माध्यमातून भांडवल देण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यात दहा हजार मच्छिमार व्यवसायाशी निगडीत असणाऱ्यांना प्रत्येकी १ लाख ६० हजार रुपये विनातारण कर्ज, किसान क्रेडिट कार्ड वाटप मोहीम प्रक्रिया सुरु केली आहे. याचा लाभ मत्स्य शेती करणाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक मत्स्य विकास अधिकारी किरण वाघमारे यांनी केले.
मत्स्य शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड
आंबेगाव मंचर येथे किसान क्रेडिट कार्ड उपक्रम अंमलबजावणीसाठी आयोजित केलेल्या मत्स्य शेतकरी मेळाव्यात वाघमारे बोलत होते. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र घोडेगाव शाखेचे अधिकारी राकेश कुमार, मंचर शाखेचे सतीश वाडेकर, युनियन बँकेचे अधिकारी दिनेश शेडगे, पुणे जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी एल. बी थोरात, ग्रोवेल मत्स्य खाद्य कंपनीचे अधिकारी जयप्रकाश तिवारी यांच्यासह मत्स्य शेती करणारे ४० शेतकरी उपस्थित होते.
यावेळी एस. के. फिशरीजचे संतोष खामकर, सुमित शिनगारे व मयूर भोर यांच्या हस्ते अधिकारी व मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांचे किसान क्रेडिट कार्डचे अर्ज विहित नमुन्यात भरून घेण्यात आले.
( हेही वाचा : …तर कोरोना झाल्यास स्वखर्चाने इलाज करावा – उच्च न्यायालय )
कोणते मत्स्यपालक शेतकरी घेऊ शकतात किसान क्रेडिट कार्ड?
- देशांतर्गत मत्स्यपालन करणारे
- मत्स्य पालक ( व्यक्तिगत किंवा समूह, भागीदारीत असणारे, भाड्याने जमीन करणारे शेतकरी )
- स्वयंसहायता गट
- महिला गट