देशभरात नव्या कामगार कायद्याची अंमलबजावणी 2022-2023 या आर्थिक वर्षांत होण्याची शक्यता आहे. या कायद्यातील तरतुदींनुसार कर्मचा-यांना आठवड्याचे फक्त 4 दिवस काम करावे लागणार आहे. अस असलं तरी यासाठी कामाच्या 4 दिवसातील दिवसभराचे कामाचे तास वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे आता कर्मचा-यांना 4 दिवस काम करताना दिवसाचे 12 तास काम करावे लागणार आहे. या कायद्यात आठवड्याला 48 तास काम करण्याची मर्यादा तशीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आठवड्यात मिळणा-या तीन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आता कर्मचा-यांना 8 वा 9 तासांऐवजी 12 तास काम करावे लागणार आहे.
नव्या आर्थिक वर्षात कायदा लागू
कामगार कायद्यात चार प्रमुख बदल करण्यात आले आहेत. या लेबर कोड्समुळे कामगारांचे हित, सुरक्षा, आरोग्य, पगार, नोकरीची सुरक्षा याचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी राज्यसभेत भूकेंद्र यादव यांनी सांगितले की, केंद्र सरकारने यापूर्वीच कायद्यांच्या मसुद्याला अंतिम स्वरूप दिले आहे. आता राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या बाजूने मसुदा तयार करणे आवश्यक आहे. यासंदर्भात 13 राज्यांनी आतापर्यंत मसुदा तयार केला आहे. 2022-23 या चालू आर्थिक वर्षांत नव्या कामगार कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी देशभरात होऊ शकते.
काय होणार बदल
- सध्या उद्योग आणि खासगी क्षेत्रातील कर्मचा-यांना रोज 8 तास काम आणि 6 दिवसांचा आठवडा आहे. नव्या बदलानुसार कर्मचा-यांना 4 दिवस रोज 12 तास काम करावे लागेल. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच 48 तास कामाचे भरतील.
- तीन दिवस विकली ऑफ म्हणजे सुट्टी असेल. यामुळे कुटुंबासोबत कर्मचा-यांना अधिक वेळ देता येणार आहे. तसेच पर्यटनालाही चालना मिळेल, असा सरकारचा अंदाज आहे.
- नवीन कामगार कायद्यानुसार 15 मिनिटे जास्त काम केले तरी त्याला ओव्हरटाईम मिळण्याची तरतूद आहे. त्यामुळे कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कोटय़ावधी कर्मचा-यांना लाभ मिळेल.
- पाच तास काम केल्यानंतर कर्मचाऱ्याला अर्ध्या तासाचा ब्रेक
- नव्या कामगार कायद्याची अंमलबजावणी झाल्यास कर्मचा-यांच्या हातात मिळणारा पगार (इन हॅण्ड सॅलरी) कमी होईल. कारण एकूण पगारात बेसिक सॅलरी 50 टक्के असेल आणि 50 टक्के अलाऊंस असतील. सध्या बेसिक सॅलरीपेक्षा अलाऊंस जास्त आहेत.
- बेसिक पगार 50 टक्के झाल्यास कर्मचाऱयांचा भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) वाटा वाढेल. पर्यायाने कंपनीवरही पीएफचा बोजा वाढेल.
- बेसिक सॅलरी वाढल्यामुळे कर्मचाऱयांच्या ग्रॅच्युटीमध्येही वाढ होईल.
( हेही वाचा: हिस्टॉरिक फोटोग्राफर ऑफ द ईयर 2021 स्पर्धा : नामांकन मिळवलेले काही भन्नाट फोटो पहाच)