मुंबई महापालिका आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईला न्यायालयात आव्हान देणाऱ्या फेरीवाल्यांना कडक शब्दांत सुनावले. पदपथ आणि रस्त्यावर अतिक्रमण होऊन नागरिकांना चालण्यास पुरेशी जागा राहत नसेल तर ते खपवून घेतले जाऊ शकत नाही. याला परवानगी दिली तर नागरिकांनी चालायचे कुठे असे मत नोंदवून महापालिकेला १० एप्रिलपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिल्यानंतर शनिवारी महापालिका आणि पोलिसांनी दादर रेल्वे स्थानकाजवळील फेरीवाल्यांविरोधातील कारवाई कडक केली. एरव्ही शनिवारी स्टेशन परिसराला विळखा घालणाऱ्या फेरीवाल्यांना पोलिसांनी फिरकूही दिले नाही. त्यामुळे शनिवारी हा परिसर फेरीवालामुक्त पाहायला मिळत होता.
दादर रेल्वे स्थानकाजवळच्या एम सी जावळे मार्ग व केळकर मार्गावरील चार बाय चार फुटाच्या लाकडी स्टॉलधारकांनी महापालिका व पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात याचिका दाखल केली. महापालिका व पोलिसांनी ९ जानेवारी रोजी कारवाई केली होती. या कारवाईत आमचे सामान जप्त केले आणि दंड लावला, असा या दावा याचिकाद्वारे केला आहे.
या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी व न्यायमूर्ती आर एन लढ्ढा यांच्या खंडपीठाने फेरीवाल्यांनी कायद्याने आखून दिलेल्या चौकटीतच आपला व्यावसाय करायला हवा अशी टिप्पणी नोंदवली. अतिक्रमणाला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा दिला जावू शकत नाही. कारण अशाप्रकारची नागरिकांनी पायी चालण्याच्या मूलभूत हक्कावरच गदा येते अशीही टिप्पणी नोंदवली आहे.
न्यायालयाने याचिकेविरोधात टिप्पणी व्यक्त करत १० एप्रिल रोजी महापलिकेला आपली भूमिका स्पष्ट करण्याचा निर्देश दिल्यानंतर, शनिवारी दादर रेल्वे स्थानकाच्या परिसरात कडक कारवाई करून जावळे मार्ग व केळकर मार्गासह इतर सर्व मार्गावर फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे एरव्ही शनिवारच्या दिवशी फेरीवाल्यांमुळे गजबजलेला दादरचा परिसर सुना सुना दिसत होता. पोलीस उपायुक्तांनी जातीने या भागात भेट देऊन पोलिसांनी याबाबतच्या सूचना केल्यानंतर खुद्द पोलीस फेरीवाल्यांना बसू देत नव्हते. त्यामुळे दादरचा परिसर फेरीवालामुक्त झाल्याचे पाहायला मिळत होते. न्यायालयाने कान उपटल्यानंतर ही कारवाई होत असली तरी ही कारवाई पुढे किती दिवस राहणार आणि जनतेला पदपथावरुन विनाअडथळा चालता येणार का असा प्रश्न रहिवाशांसह रेल्वे प्रवाशांकडूनही विचारला जात आहे.
(हेही वाचा – शिवतिर्थावर धुळवड, मैदानातील लाल माती काढून टाकण्याची होतेय मागणी)
Join Our WhatsApp Community