Assembly Election : ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ उपक्रमाचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून कौतुक

313
Assembly Election : 'आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ उपक्रमाचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून कौतुक
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडून लोकशाही अधिक बळकट करण्याची जबाबदारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर असते. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) प्रक्रिया अत्यंत निकोप आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांमध्ये करण्यात आलेल्या पूर्वतयारींचा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी संयुक्तपणे मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी १४ ऑक्टोबर २०२४ रोजी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबईतील मतदारांना घरबसल्या त्यांचे मतदान केंद्र जाणून घेता यावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ (Know Your Polling Station) या उपक्रमाचे चोक्कलिंगम यांनी कौतुक केले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, आसनव्यवस्था आदी ‘निश्चित किमान सुविधा’ (Assured Minimum Facilities) पुरविण्याचे निर्देश देखील चोक्कलिंगम यांनी यावेळी दिले. अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. विजय राठोड, महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार यांच्यासह मुंबईतील विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अन्य संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. (Assembly Election)

(हेही वाचा – फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी निराधार; Atul Bhatkhalkar यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल)

बैठकीच्या सुरुवातीला अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांमधील विविध मतदारसंघ, सुसूत्रीकरणानंतर मतदान केंद्रांमध्ये झालेले बदल, मनुष्यबळांची नियुक्ती आणि निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबतची सद्यस्थिती यासंदर्भात सादरीकरण केले. मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम म्हणाले की, मुंबईत घडणाऱ्या बारीकसारीक बाबींची चर्चा देशभर होत असते. त्यामुळे, निवडणुकीच्या तयारींमध्ये कोणतीही हयगय होऊ नये, यासाठी प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्यांनी सतर्कतेने नियोजन करावे. ६ लोकसभा आणि ३६ विधानसभा मतदारसंघ असलेले हे देशातील एकमेव महानगर आहे. त्यामुळे, या महानगरातील निवडणूक प्रक्रियेकडे आणि त्याच्या अंमलबजावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रांगेतील मतदारांसाठी आसनव्यवस्था अशा निश्चित किमान सुविधा पुरवितांना त्यात कोणतीही कमतरता राहणार नाही, याची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. मतदारांना रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी योग्यप्रकारे व्यवस्थापन करावे. केवळ मतदारच नव्हे तर मतदान प्रक्रियेत सहभागी असलेले कर्मचारी यांना ईव्हीएम संयंत्र घेतेवेळी किंवा जमा करतेवेळी संबंधित केंद्रांवर ताटकळावे लागणार नाही, याची खात्री करावी. कोणतीही अनैतिक किंवा अवैध बाब लक्षात येताच त्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. (Assembly Election)

मुंबईत काही ठिकाणी मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आल्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढली आहे किंवा मतदान केंद्राचे ठिकाण बदलेले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, या नवीन बदलांसंदर्भात मतदारांना माहिती देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ म्हणजेच ‘Know Your Polling Station’ ही जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत मतदार नोंदणी अधिकारी (BLO) मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्रांच्या ठिकाणामध्ये झालेल्या बदलांची माहिती देत आहेत. याशिवाय, नोंदणीकृत मतदारांना लेखी पत्राद्वारेही कळवत आहेत. हा अत्यंत अभिनव आणि उपयुक्त उपक्रम असल्याचे गौरवोद्गार काढून मतदारांमध्ये जनजागृतीसाठी व पर्यायाने मतदानाचे प्रमाण वाढण्यास त्यातून मदत होईल, अशी अपेक्षाही चोक्कलिंगम यांनी यावेळी व्यक्त केली. (Assembly Election)

(हेही वाचा – अभिनेते Atul Parchure यांचे निधन)

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यावेळी म्हणाले, मुंबईतील प्रत्येक मतदारसंघाची रचना, तेथील समस्या आणि आव्हाने वेगवेगळी आहेत. त्यामुळे, प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्यांनी सूक्ष्म पद्धतीने नियोजन करुन निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि सुलभ पद्धतीने पार पडेल, अशी तयारी करावी. एकाच ठिकाणी पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र असल्यास त्याठिकाणी रंगसंगतीनुसार संरचना (कलर कोड) करावी. गर्दी आणि रांगा टाळण्यासाठी टोकन व्यवस्था सुरू करावी. तसेच, प्रत्येक मतदान केंद्राला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यापूर्वी भेट दिली असेल तरी पुन्हा एकवार प्रत्यक्ष पाहणी करुन त्याठिकाणी उपलब्ध सुविधा आणि आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही गगराणी यांनी यावेळी दिले. तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी आणि कर्मचारी यांना संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात रितसर प्रशिक्षण द्यावे. त्यांच्या बारीकसारीक समस्यांचे निराकरण प्रशिक्षणावेळी करावे. जेणेकरुन त्यांना प्रत्यक्ष कामकाजावेळी अडचणी येणार नाहीत, अशा सूचनाही गगराणी यांनी दिल्या. दरम्यान, दुसऱ्या सत्रात देखील विधानसभा निवडणूक तयारीच्या अनुषंगाने सर्व अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांच्या मुख्य उपस्थितीत सर्व समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) यांची बैठक घेण्यात आली. जबाबदारीनिहाय या समन्वय अधिकाऱ्यांकडे सोपविलेल्या कामकाजाचा याप्रसंगी आढावा घेण्यात आला. (Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.