कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व असल्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने चाकरमानी वर्ग कोकणात दाखल होतो. यानिमित्ताने अतिरिक्त एसटी व रेल्वे गाड्यांचे नियोजन केले जाते परंतु या गाड्यांचे आरक्षण फुल्ल होत असल्याने बरेच चाकरमानी खासगी वाहनाने प्रवास करतात. या सर्वांना कोकण गणेशभक्तांना दिलासा मिळाला असून मुंबई-पुण्यातून गणपतीला कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे सुमारे दहा हजारांहून अधिक वाहनांना टोल सवलतीचा फायदा होईल. यासाठी नागरिकांना स्थानिक प्रशासनाकडून स्टिकर घ्यावे लागणार आहेत.
( हेही वाचा : गणपतीला कोकणात जाणे महागले! विशेष रेल्वे गाड्यांचे तिकीट दर ३० टक्के अधिक )
‘गणेशोत्सव-कोकण दर्शन’ या नावाचे स्टिकर
पुणे, कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना कोकणात जाताना व परतीच्या प्रवासादरम्यान टोलमाफी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच गणपतीच्या काळात महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने महामार्गावरील यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. गेल्या वर्षी गणेशभक्तांना ‘गणेशोत्सव-कोकण दर्शन’ या नावाचे स्टिकर उपलब्ध करून देण्यात आले होते. यंदाही स्थानिक पोलीस ठाणे आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडे वाहनांची नोंदणी करून स्टिकर घ्यावे लागणार आहे.
विशेष गाड्यांचे नियोजन
गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात येण्यासाठी चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेवर मध्य आणि पश्चिम मिळून २०६ जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा तसेच प्रवाशांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला रेल्वेकडून दिला जात आहे.