कोल्हापूर जिल्ह्यात रविवार, १७ मार्चच्या रात्री भीषण अपघात घडला. पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Bengaluru National Highway) वाठार (ता.हातकणंगले) येथील पुलाजवळ सिमेंट काँक्रीटचे मिक्सर मशीन रस्त्याच्या कडेला लावत असतांना पाठीमागून आलेल्या ट्रकने मजुरांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ४ मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर ८ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तिघे सेंट्रिंग मजूर आहेत. हे मजूर भादोले (ता. हातकणंगले), तर वाठार येथील एक पादचाऱ्याचा समावेश आहे. (Kolhapur Accident)
काय घडले घटनास्थळी ?
भादोले (ता.हातकणंगले) येथील स्लॅब कंत्राटदार रियाज मुजावर १५ मजुरांसह टेम्पो व क्रॉंक्रिट मिक्सर यंत्रसामग्री घेऊन शिये येथे सकाळी नऊ वाजता गेले होते. शिये येथे एका इमारतीच्या स्लॅबचे काम दिवसभर सुरू होते. ते संपल्यानंतर कामगार आणि इतर साहित्यासह टेम्पो गावाकडे परतत होता. टेम्पोतून सर्व मजूर वाठार येथील पुलाजवळ आले. तेथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कामावर क्रॉंकिटचे मिक्सर मशीन ठेवून सर्वजण घरी जाणार होते. त्या ठिकाणी टेम्पोला बांधलेले मिक्सर मशीन सोडवण्याचे काम सुरू केले. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने मिक्सरला जोराची धडक दिली. ट्रकने रस्त्यावरील मजुरांना चिरडले. त्यातील एक जागीच ठार झाला, तर इतर तिघांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.
अपघाताचे वृत्त समजताक्षणीच घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक भीममोंडा पाटील, उपनिरीक्षक लक्ष्मण सलगर यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिस दाखल झाले होते. याशिवाय महामार्ग पोलिसही आले. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. त्याचा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
सचिन सदाशिव धनवडे (वय ४०), बाबालाल इमाम मुजावर (५०), विकास वड्ड (२६, सर्व रा. भादोले), श्रीकेशव पास्वान (६० रा. वाठार) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. सचिन पांडुरंग भाट (३०), कुमार तुकाराम अवघडे (४२), सुनील कांबळे (४०), भास्कर दादू धनवडे (६०, सर्व रा. भादोले), लक्ष्मण मनोहर राठोड (४०), त्यांच्या मुली सविता (१७) आणि ऐश्वर्या (१५, तिघे रा. विजापूर, सध्या भादोले) अशी जखमींची नावे आहेत. (Kolhapur Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community