मुंबईतील कोळीवाड्यातील महिलांनी बनविलेले रूचकर मासळी पदार्थ हे मुंबईकरांना फूड ऑन व्हील योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार मिळावा, या अनुषंगाने दोन फूड ऑन व्हीलच्या गाड्या घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे पर्यटनाच्या जोडीलाच आता स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वादही पर्यटकांना घेता येणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष अॕड. राहुल नार्वेकर आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बधवार पार्क कोळीवाड्याच्या विकासासाठी महानगरपालिकेने भर दिला आहे. कोळीवाड्यांच्या सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत मुंबई शहरातील बधवार पार्क, माहीम आणि वरळी कोळीवाडा सुशोभीकरणासाठी महानगरपालिकेकडून सुरूवात करण्यात आली आहेत. बधवार पार्क कोळीवाडा येथे स्थानिक कोळीवाड्यातील महिलांनी तयार केलेले मासळी अन्नपदार्थ (उदा. जवळा, बोंबील, कोळंबी आदी) तयार करून भेट देणाऱ्या पर्यटकांना आस्वादासाठी देण्यात येणार आहेत. त्यामुळेच पर्यटनासोबतच स्थानिक अन्नाचा आनंदही पर्यटकांना घेणे शक्य होईल. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या संस्था किंवा महिला बचतगटांना या फूड ऑन व्हीलची सुसज्ज अशी गाडी वापरासाठी देण्यात येणार आहे.
कोळी महिलांसाठी अशा प्रकारची फूड ऑन व्हीलची गाडी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन विकास निधी (डीपीडीसी) चा वापर करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कोळीवाड्यांच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सौंदर्यीकरणाच्या कामांतर्गत बधवार पार्क येथील कोळीवाड्यातील जेट्टीच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाले आहे. तर फूड ऑन व्हीलच्या वाहनांसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून ३४ लाख ५१ हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या वाहनांसाठी निधी मंजूरीसाठी उपआयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. फूड ऑन व्हीलच्या दोन वाहनांची खरेदी करण्यासाठी २८ लाख १३ हजार रूपयांचा निधी गरजेचा आहे. याठिकाणी पर्यटन वाढीच्या अनुषंगाने बोटीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सुशोभिकरणाच्या कामासाठी सहायक आयुक्त शिवदास गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली कामे प्रगतीपथावर वेगाने सुरू आहेत.
फूड ऑन व्हील व्हॅनची रचना अशी असेल
स्थानिक पातळीवर महिला बचतगट किंवा स्वयंसेवी संस्थांना फूड ऑन व्हीलची जबाबदारी देण्यात येईल. या व्हॅनमध्ये महिलांना अन्नपदार्थ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य ठेवण्यासाठीचे कप्पे तयार करण्यात येणार आहेत. तसेच फुड स्टॉलच्या माध्यमातून सेवा सुविधा देण्याची या व्हॅनची रचना असणार आहे. रोजगार मिळतानाच कोळीवाड्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, हा संकल्पनेचा उद्देश आहे.
Join Our WhatsApp Community