महेश मांजरेकरांना अटक होणार?

130

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नाय वरण-भात लोंचा कोन नाय कोंचा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर व अन्य संबंधित व्यक्तींवर अखेर माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये बालकलाकारांकडून अतिशय टोकाची हिंसा, आक्षेपार्ह दृश्यं करुन घेण्यात आली असल्यामुळे अतिशय अर्वाच्य भाषाही त्यांच्या तोंडी आहेत. अत्यंत बिभत्स ट्रेलर व चित्रपट बनवून बालकांचा चुकीचा वापर केल्याने चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर, निर्माते नरेंद्र हिरावत, निर्माते श्रेयस हिरावत, सहनिर्माता विजय शिंदे व अन्य संबंधितांनी केवळ अर्थाजनाच्या उद्देशाने हा चित्रपट तयार केला असल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. त्यामुळे मांजरेकरांना अटक होण्याचा शक्यता आहे.

स्त्रीशक्ती संस्थेच्या सीमा देशपांडे यांची तक्रार

दरम्यान, बालकलाकारांकडून आक्षेपार्ह चित्रण केल्याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते व संबंधितांविरोधात कारवाई करण्याकरिता भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्यावतीने माहीम पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली होती, त्यानंतर तेथील पोलीस उपायुक्त व पोलीस सहा आयुक्त, मुंबई येथे तक्रार दिली होती. मात्र त्यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे सदर प्रकरण स्त्रीशक्ती संस्थेच्या सीमा देशपांडे यांनी प्रकाश सालसिंगिकर यांच्या मार्फत न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाकडून आदेश देण्यात आल्यामुळे आज संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा बॉम्बस्फोट करणाऱ्यांशी मलिकांचे व्यवहार! फडणवीसांचा घणाघात)

पोलीस तपासाकडे लक्ष

नाय वरण-भात लोंचा कोन नाय कोंचा’ या चित्रपटात १३ ते १५ वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुलांना लैंगिक संबंधांमध्ये गुंतलेले, टोकाची हिंसा करतांना, अर्वाच्य शिव्या व अश्लिल भाषेचा वापर करतांना आणि जवळच्या महिला नातेवाईकांबरोबर अनैतिक संबंध ठेवतांना दाखवले असल्याचे भारतीय स्त्री शक्ती संघटनेने सादर केलेल्या तक्रारपत्रात म्हटले आहे. तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, या चित्रपटाच्या माध्यमातून मुंबईतील गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील स्त्रीयांचे अतिशय विकृत चित्रीकरण करण्यात आले आहे. या चित्रपटात पोक्सो (POCSO) सहीत अन्य कायद्यांचे उल्लंघन तर आहे. येत्या काळात पोलीस तपासात काय समोर येते, या सगळ्यांना अटक होते का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

या प्रकरणी पोक्सो न्यायालयात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून याचिका दाखल करण्यात आली होती.
न्यायालयाने चौकशी करून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे माहीम पोलिसांना आदेश दिले होते. बुधवारी माहीम पोलीस ठाण्यात महेश मांजरेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश मांजरेकर यांच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम २९२, ३४ आणि पोक्सो कायद्याच्या कलम १४ आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ आणि ६७-ब या कलमांखाली दाखल केला एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये लावण्यात आलेले कलम हे गंभीर स्वरूपाचे तसेच अजामीनपात्र असल्यामुळे महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.