मुंबईमधील चाकरमानी प्रत्येक सणवाराला कोकणाची वाट धरतात. गणेशोत्सवानंतर नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान पुन्हा एकदा कोकणवासीय व पर्यटक कोकणाकडे वळतात. हा प्रामुख्याने जत्रा, यात्रा, पर्यटनचा कालखंड असल्यामुळे या काळात रेल्वे, एसटी तसेच खासगी वाहतूकीमार्फत देखील प्रवाशांची गर्दी असते. यंदा नव्याने सुरू झालेल्या विमानसेवेलाही प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून, ३१ डिसेंबरपर्यंत विमानसेवेचे आरक्षण जवळपास फुल्ल होत आले आहे.
विमानसेवेच्या अतिरिक्त फेऱ्या
कोकणात जाणारा चाकरमानी सर्वसामान्य असल्यामुळे हवाई मार्गाला कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत साशंकता होती. परंतु, सणासुदीच्या दिवसात प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून विमानसेवेचे तिकीट दर २ हजार ५०० रुपयांवरून, सणासुदीच्या काळात कोकणात जाण्यासाठी तब्बल ५ हजार ते १२ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. आता पर्यंतच्या आरक्षणाचा आढावा घेतल्यास विमानसेवाच्या अतिरिक्त फेऱ्या वाढवाव्या लागतील असे, चित्र निर्माण झाले आहे. कोकणातील पर्यटनाला दिवसागणिक वाढता प्रतिसाद मिळत असल्याने विमानसेवाचा कमी कालावधीत होणारा प्रवास प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरतो.
( हेही वाचा : एचएससी, एसएससी विद्यार्थ्यांना परीक्षा ‘फी’ परत मिळणार! )
दरवाढीवर नियंत्रण नाही का?
चिपी विमानतळाचा समावेश केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या उडाण योजनेत करण्यात आला आहे. त्या अंतर्गत किफायतशीर सेवा देत हवाई मार्गाचा विकास करणे अभिप्रेत आहे. मात्र मुंबई-सिंधुदुर्ग मार्गावर भरमसाठ दरवाढ करण्यात आली आहे. याकडे केंद्र सरकारचे लक्ष नाही का ? असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
Join Our WhatsApp Community