मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकणात बाप्पाच्या विसर्जनाला पाऊस लावणार हजेरी

मागच्या दोन दिवसांपासून सायंकाळीच दाट काळोख अनुभवणा-या मुंबई, ठाणेकरांना शुक्रवारी बाप्पाच्या विसर्जनालाही मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटांचा सामना करावा लागेल. संपूर्ण राज्यात दिवसभरात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना सुरु राहतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दुपारी जाहीर केलेल्या अंदाजपत्रात व्यक्त केला आहे.

नाशिक,रायगड आणि रत्नागिरीत अतिवृष्टी तर उर्वरित कोकणात मुसळधार सरी कोसळतील. कोकण, मध्य महाराष्ट्रासह परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यांत मुसळधार सरींसह यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सायंकाळी गणरायाची मिरवणूक रंगात आलेली असताना वरुणराजा विजांच्या कडकडाटांसह हजेरी लावणार आहे. गुरुवारी जास्त पाऊस कोसळल्याने ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. सायंकाळी लोकलचाही खोळंबा झाला. शुक्रवारच्या अंदाजपत्रात आजही गणेशभक्तांना सायंकाळी मुसळधार सरींचा सामना करावा लागणार आहे. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरात हलका पाऊस होईल. मात्र वा-यांचा वेग जास्त राहील. तिन्ही जिल्ह्यांत ३० ते ४० ताशी वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना आणि बीडमध्येही ३० ते ४० ताशी वेगाने वारे वाहत,ृ हलका पाऊस सुरु राहील.

रायगड, रत्नागिरीला रविवारी आणि सोमवारी ऑरेंज अलर्ट

शुक्रवारसारखे वातावरण राज्यात शनिवारीही कायम राहील. कोकणात केवळ सिंधुदुर्गात विज आणि मेघगर्जना रविवारी दिसून येणार नाही. केवळ मुसळधार सरी कोसळतील. रविवारी आणि सोमवारी रायगड आणि रत्नागिरीत अतिवृष्टीची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात मंगळवारपर्यंत मुसळधार पावसाचा मारा सुरु राहील.

येत्या आठवड्यात मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी

पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत सोमवारी वा-यांचा प्रभाव संपेल. पुढील पाच दिवस जिल्ह्यांत पुणे आणि कोल्हापूरात मुसळधार पाऊस राहील. साता-यात रविवारपासून अतिवृष्टीला सुरुवात होईल. नाशिक जिल्हयांत सोमवार वगळता मंगळवारपासून पुन्हा मुसळधार सरींना सुरुवात होईल.

विदर्भात एखाद दुसरा दिवस मुसळधार पावसांची हजेरी राहणार

विदर्भात रविवारपासून मुसळधार सरींना सुरुवात होईल. अमरावती जिल्ह्यांत रविवारपासून सलग तीन दिवस मुसळधार पाऊस होईल. रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारी नागपूर आणि अकोल्यात मुसळधार पाऊस होईल. संपूर्ण विदर्भात मंगळवारपर्यंत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना सुरु राहतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here