कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय, ‘या’ घाटातील वाहतूक २५ ऑगस्टपर्यंत बंद

गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्याहून अनेक लोक कोकणात जातात. परंतु पावसाळ्यात कोकणातील अनेक घाटांमध्ये संरक्षक भिंत, दरड कोसळून वाहतूक ठप्प होते, यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होते. याच पार्श्वभूमीवर यंदा कोकणातील वाहतूक व्यवस्थापनेचे आधीच नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६-जी वरील गगनबावडा घाटात संरक्षण भिंत दरीत कोसळून हा रस्ता जड व अवजड वाहतुकीसाठी असुरक्षित झालेला आहे. त्यामुळे हा रस्ता दिनांक २५ ऑगस्ट पर्यंत जड व अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी काढली आहे.

( हेही वाचा : मोदी सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंतच्या कर्जामध्ये १.५ टक्के सूट)

२५ ऑगस्टपर्यंत जड आणि अवजड वाहतूक बंद

गगनबावडा घाटातील संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम विना अडथळा पूर्ण होण्यासाठी मौजे एडगाव (एडगाव तिठा) ते करुळ घाट गगनबावडा हद्दीपर्यंत, जड व अवजड वाहनांची वाहतूक २५ ऑगस्ट २०२२ पर्यंत बंद करुन कोल्हापूरवरुन येणारी अवजड वाहने खंडासरी (क्रशर चौक) चौकातून उजव्या वळणाने फोंडा घाटाने राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६-जी कडे तसेच गोव्यावरून कोल्हापूरकडे जाणारी अवजड वाहने नांदगाव तिठ्यावरुन फोंडा घाटातून कोल्हापूरकडे या पर्यायी मार्गाने मार्गस्थ होतील, असे या परिपत्रकात नमूद केले आहे.

वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला रस्ता व पर्यायी वाहतुक मार्ग लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दिशादर्शक फलक, वाहतूक संकेत चिन्हे लोकांना समजेल अशा भाषेत लावण्याची कार्यवाही करावी असेही या अधिसूचनेत म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here