कोकण रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील कळंबणी ते दिवाणखवटी या स्थानकांदरम्यान नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मंगला एक्स्प्रेस गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे रेल्वे मार्गावरील वाहतूक सुमारे सव्वादोन तास ठप्प झाली. दुसरे इंजिन मागवण्यात आल्यानंतर ते जोडून रखडलेली गाडी दुपारी साडेबारा वाजता रवाना करण्यात आली आहे. मंगला एक्स्प्रेसच्या इंजिन बिघाडामुळे कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या दुपारपासून विलंबाने धावत आहेत.
( हेही वाचा : देशाच्या प्रगतीचा महामार्ग! दिल्ली ते मुंबई सुसाट प्रवास, द्रुतगती मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण)
कोकण रेल्वे प्रवाशांची गैरसोय
गाडी रखडल्याने मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान धावणारी मांडवी एक्स्प्रेस, दिवा- सावंतवाडी सिंधुदुर्ग एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या करंजाडी स्थानकात रखडल्या असून रविवार असल्यामुळे मुंबईतून गावी आणि गावाकडून मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूंकडील प्रवाशांची गर्दी सर्वच रेल्वे स्थानकांवर झाली आहे. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून संपूर्ण रेल्वेचे इलेक्ट्रिफिकेशन होऊन सुद्धा कोकण रेल्वे प्रवाशांना सोयीचा प्रवास कधी करता येईल असे प्रश्न चाकरमान्यांकडून विचारले जात आहेत.
Join Our WhatsApp Community