कोकण रेल्वे मार्गावर आणखी २ रेल्वे गाड्या डिझेलऐवजी विजेवर चालवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. यात तिरुनेलवेली-दादर साप्ताहिक एक्स्प्रेस आणि मंगळुरू-मडगाव गाड्यांचा समावेश आहे. यामुळे विद्युत इंजिनावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या ३१ वर पोहोचणार आहे.
( हेही वाचा : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील ‘सर्वोच्च’ सुनावणी संपली; पुढील सुनावणी २८ फेब्रुवारीला )
कोकण रेल्वे मार्गाचे संपूर्ण विद्युतीकरण झाल्यानंतर १५ सप्टेंबरपासून एकामागोमाग एक रेल्वेगाड्या विद्युतशक्तीवर धावत आहेत. आतापर्यंत २९ रेल्वेगाड्या विजेवर धावत होत्या. त्यात आणखी २ गाड्यांची भर पडणार आहे. तिरुनेलवेली- दादर साप्ताहिक एक्स्प्रेस २२ फेब्रुवारीपासून, तर मंगळुरू-मडगाव नियमित गाडी ४ मार्चपासून डिझेलऐवजी विजेवर चालवण्यात येणार आहे. दरम्यान, हिस्सार-कोईमतूर गाडीच्या थिवी थांब्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या या गाडीला थिवीम येथील थांब्याला मुदतवाढ देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती.
विद्युतीकरणाचा फायदा
मुंबई ते कोकण या मार्गावर आता जवळपास ३१ रेल्वेगाड्या धावणार आहेत. विद्युतीकरणामुळे कोकणाचे सौंदर्य अबाधित राहून प्रदूषण कमी होईलच शिवाय सर्व रेल्वेगाड्या विजेवर सुरू केल्यानंतर तब्बल १५० कोटींची बचत करणे शक्य होणार आहे असा विश्वास कोकण रेल्वेने व्यक्त केला आहे. मेल, एक्स्प्रेस गाड्यांचा वेगही विद्युतीकरणामुळे वाढणार आहे.