- सुहास शेलार
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. सर्वाधिक प्राधान्य आहे ते रेल्वेला. मात्र, चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रमुख स्थानकांत गर्दी वाढू लागल्याने सजावटीचे साहित्य आणि अन्य सामान सुखरूपपणे गाडीपर्यंत नेताना कोकणवासीयांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दादर आणि ठाण्याच्या मध्ये कोकण रेल्वेला (Konkan Railway) थांबा मिळावा, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात आहे. या मागणीला आता मूर्तस्वरुप येत असून, कोकणात जाणाऱ्या काही गाड्यांना भांडुप स्थानकात थांबा देण्याचा विचार रेल्वेकडून केला जात आहे.
उत्सवप्रिय कोकणात दोन सण दणक्यात साजरे होतात. एक गणेशोत्सव आणि दुसरा शिमगा. कोकणातील गणेशोत्सव हा कुटुंबाला बांधणारा, रक्ताची नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा सण म्हणून ओळखला जातो. पाहुणे, मुलांची धम्माल, जुन्या-नव्या पिढीसोबत गप्पा, नाच-गाण्यांच्या कार्यक्रमांची जागरणं, सासर-माहेरची माणसं एकत्र येणं असा हा ऊर्जावर्धक सण आहे. कोकणातील मूळ निवासी, व्यवसाय-उद्योग-नोकरी निमित्ताने बाहेरगावी कुठेही असला, तरी गणपतीला तो गावी येणारच! त्यामुळे गणेशोत्सवात देशातील प्रमुख शहरांतून कोकणात विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन केले जाते. प्रामुख्याने मुंबईहून मोठ्या प्रमाणात गाड्या कोकणात सोडल्या जातात.
कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावर धावणाऱ्या गाड्या दादरनंतर थेट ठाण्यात थांबतात. त्यामुळे पूर्व उपनगरात भांडुप, कांजूर, विक्रोळी, घाटकोपर आदी भागांत राहणाऱ्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील चाकरमान्यांना दादर अथवा ठाणे येथे उतरून पुन्हा लोकल पकडून घरी यावे-जावे लागते. पालिकेच्या ‘एस’ विभागात मोडणाऱ्या भांडुप, कांजूर, विक्रोळी या भागातील सुमारे ७ लाख ७२ हजार लोकसंख्येपैकी सुमारे तीन ते साडेतीन लाख कोकणी लोकवस्ती आहे. घाटकोपर ‘एन’ विभागातील सुमारे ६ लाख ४६ हजार लोकसंख्येपैकी सुमारे दीड लाखांपेक्षा जास्त कोकणी पट्टा आहे. यात असल्फापासून भटवाडी व अन्य पश्चिमेकडील भागाचा समावेश आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दादर आणि ठाण्याच्या मध्ये एक थांबा द्यावा, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात आहे.
या मागणीची दखल घेऊन भांडुप स्थानकावर कोकण रेल्वेला (Konkan Railway) थांबा देण्यास रेल्वे प्रशासनाने अनुकूलता दर्शवली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. पहिल्या टप्प्यात कोकणकन्या आणि तुतारी या दोन्ही गाड्यांना थांबा दिला जाणार आहे. केवळ गणेशोत्सव काळात नव्हे, तर कायमस्वरूपी या गाड्या भांडुपला थांबतील. त्यामुळे भांडुप, कांजूरमार्ग, घाटकोपर आदी भागात राहणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.
कधीपासून सुरुवात?
पुढील गणेशोत्सवापूर्वी भांडुपमध्ये कोकण रेल्वेला थांबा देण्यास रेल्वे प्रशासन अनुकूल आहे. त्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येणार असून, रेल्वे मंत्रालयाने ४१ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. प्लॅटफॉर्मची लांबी वाढवल्यानंतर लोकल रेल्वेच्या वेळापत्रकाचे नियोजन करून कोकणकन्या आणि तुतारी या दोन्ही गाड्यांना भांडुप रेल्वे स्टेशनवर थांबा देणे शक्य होणार आहे.
मेमू रेल्वे रत्नागिरीपर्यंत
दिवा ते रोह्यापर्यंत धावणारी मेमू रेल्वे (पूर्णपणे अनारक्षित) या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी पहिल्यांदाच रत्नागिरीपर्यंत धावणार आहे. २ ऑक्टोबरपर्यंत या गाडीची फेरी दररोज चालवली जाईल. या गाडीला आधी देण्यात आलेल्या थांब्यांमध्ये रायगडमध्ये सापे वामने, करंजाडी, तसेच खेड तालुक्यात अंजनी हे आणखी दोन थांबे वाढवण्यात आले आहेत. नियमित गाड्यांसह यापूर्वी जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे गणपती उत्सवातील आरक्षण फुल्ल झाल्यामुळे मध्य रेल्वेने यावर्षी गणेशोत्सवासाठी गणपती स्पेशल गाड्यांच्या आणखी १५६ फेऱ्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार गणेशोत्सवात मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीपर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार आहे.
याआधी गणेशोत्सवात डेमू तसेच मेमू स्पेशल गाडीचा प्रयोग चिपळूणपर्यंतच करण्यात आला होता. त्यापुढे मेमू स्पेशल गाड्या चालवल्या जात नव्हत्या. मात्र, आता गणेशोत्सवात कोकण रेल्वे (Konkan Railway) तसेच मध्य रेल्वेकडून दिवा ते रत्नागिरी मार्गावर प्रथमच मेमू स्पेशल गाड्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्या रत्नागिरी स्थानकापर्यंत धावणार आहेत. सकाळी ७:१० वाजता ही गाडी दिवा स्थानकातून सुटणार आहे. ती दुपारी २:५५ वाजता रत्नागिरीत पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दुपारी ३:४० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १०:४० वाजता दिवा जंक्शनला पोहोचेल.
Join Our WhatsApp Community