रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी कृष्णा हेगडे यांची अॅमेझॉनला साद!

68

कोविड-१९च्या दुस-या त्सुनामीने थैमान घातल्याने, राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन प्रमाणेच कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे या काळात अनेकांवर आपल्या रोजगाराला मुकण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरगरीब जनतेला आधार मिळावा म्हणून, या काळात काही योजना जाहीर केल्या आहेत. पण एकंदरीतच बेरोजगारी आणि इतर गरीब घटकांचा विचार करता या योजना तोकड्या पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या वर्गाला आधार देण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. मुंबई उपनगर रिक्षा आणि टॅक्सी चालक कामगार सेवा संघाचे अध्यक्ष कृष्णा हेगडे यांनी, रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या रोजगारासाठी आता थेट अॅमेझॉनला साद घातली आहे.

हेगडे यांचे अॅमेझॉनला पत्र

कृष्णा हेगडे यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना रोजगार मिळावा, यासाठी अॅमेझॉन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अमित अग्रवाल यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी या कडक निर्बंधाच्या काळात रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या रोजगाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कोविड-१९ महामारीच्या काळात या चालकांचे उत्पन्न ठप्प झाले आहे. अॅमेझॉन ही जगातील नामवंत अशी कंपनी आहे. तसेच सगळ्यात जास्त रोजगार देण्यात अॅमेझॉनचा मोठा वाटा आहे. त्यामुळे अॅमेझॉनच्या माध्यमातून मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना रोजगार मिळावा, अशी मागणी कृष्णा हेगडे यांनी केली आहे.

(हेही वाचाः कोरोना काळात शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचा संप!)

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना रोजगार देण्याची मागणी

अॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून वस्तूंची मागणी केली जाते. अॅमेझॉनच्या कर्मचा-यांमार्फत या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जातात. मुंबई आणि मुंबई बाहेरील ग्राहकांपर्यंत रिक्षा आणि टॅक्सी चालकांमार्फत या वस्तूंची डिलिव्हरी व्हावी, अशी मागणी हेगडे यांनी केली आहे. जेणेकरुन या चालकांना चांगला रोजगार प्राप्त होऊ शकेल. तसेच ग्राहकांपर्यंत या वस्तू वेळेत आणि योग्य पद्धतीत पोहोचवल्या जातील, असा विश्वास कृष्णा हेगडे यांनी व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.