कुर्ला भाभा हॉस्पिटल येथे रुग्णांच्या असुविधेबाबत वारंवार सूचना करूनही कोणत्याही प्रकारची सुधारणा न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मंगळवारी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका यांच्या दालनाबाहेर धरणे आंदोलन केले. आधीच कोविडमुळे बाधित रुग्ण त्रस्त असताना त्यातच इतर आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याने लोकप्रतिनिधींना कोविडची तमा न बाळगता इतर आजारांच्या रुग्णांना चांगल्याप्रकारे सुविधा मिळाव्यात यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.
अशी होतेय गैरसोय!
कुर्ला येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांची कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन करताना, या रुग्णालयातील गैरसोयीचा आणि असुविधेचा पाढाच वाचला. या रुग्णालयात अनुसूचिवरील अर्थात शेड्युल्डवरील औषधे उपलब्ध नाहीत. रुग्णांसाठी कोणत्याही प्रकारची रुग्णवाहिका उपलब्ध नाही. कोविड रुग्णांसाठी आयसीयू वॉर्ड उपलब्ध नाही. कोविड रुग्णांना पिण्यास पाणी नाही. त्यांना मास्क पुरवले जात नाही. पीडियाट्रिक रुग्णासाठी लिफ्ट नसून गरोदर महिलांना दाखल करून घेण्याबाबत योग्य नियोजन नाही. त्यामुळे अशा महिलांना फिरवले जात आहे. याबरोबरच मधुमेही रूग्णांना शेड्युल्डवरील औषधे मागील तीन वर्षांपासून मिळत नाही, सिटी स्कॅनचीही तीच अवस्था आहे, असा पाढाच खान यांनी मांडला.
(हेही वाचा : अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयात ‘आव्हान’! )
निषेधासाठी हे आंदोलन केले!
‘आपली चिकित्सा’ अंतर्गत चाचण्या करण्याची योजना असली तरी याचा फायदा रुग्णांना होत नाही. रात्रीच्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांना रक्त चाचणी करण्यासाठी बाहेर पाठवले जाते. तसेच आयसीयूमधील रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे आणायला लावले जात असल्याचे सांगत खान यांनी कोविड आणि बिगर कोविड रुग्णांच्या सुविधेकडे रुग्णालय प्रशासन गंभीरतेने लक्ष देत नाही. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे डॉ. सईदा खान यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community