परिसरात, घरात दहशत निर्माण करून प्रत्येकाला त्रास देणारा दीपक उर्फ कोत्या सांगळे याला पत्नी, मेव्हणी दोन मेव्हणे आणि कोत्याच्या दहशतीला कंटाळलेले तिघे, असे एकूण सात जणांनी कायमचा संपवून त्यांचा मृतदेह घराच्या बाहेर असणाऱ्या जागेत पुरला होता. विनोबा भावे नगर पोलिसांनी शनिवारी खोदकाम करून मृतदेहाचे अवशेष बाहेर काढले.
पोलिसांना असा आला संशय
कुर्ल्यातील बैलबाजार, क्रांती नगर येथे राहणारा दीपक उर्फ कोत्या सांगळे (३२) हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता, त्याच्यावर विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल होते. १४ जून रोजी तो अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार कोत्याच्या बहिणींने विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यात दिली होती. कोत्या हा बेपत्ता झाल्यापासून क्रांती नगरात शांतता होती, मात्र या शांततेत देखील संशयाचे वातावरण निर्माण झाले, कुजबुज सुरु झाली. कोत्या असा अचानक गायब कुठे झाला याची चर्चा परिसरात होऊ लागली. पोलिस खबऱ्यांनी याबाबत गुन्हे शाखेला माहिती दिली की, कोत्याला गायब करण्यामागे पत्नी आणि मेव्हण्याच्या हात आहे.
कोत्याच्या मेव्हणीने दिली कबुली
गुन्हे शाखा कक्ष ५ ने संशयावरून कोत्याची पत्नी सरस्वती, मेव्हणी मनीषा, मेव्हणे आनंद आणि अदित यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्रत्येकाकडे वेगवेगळी चौकशी करण्यात आल्यानंतर कोत्याची मेव्हणी फुटली आणि तिने कोत्याला ठार केल्याची कबुली गुन्हे शाखेला दिली. कोत्याला आम्ही सर्वांनी मारून घराबाहेर पुरले असल्याचे ताब्यात घेण्यात आलेल्या पत्नी आणि इतरांनी दिली. गुन्हे शाखेने विषाल राजीव कराडे (२५), किशोर प्रमोद साहू (२७), मेव्हणे आनंद मस्तराम गौतम (२१) आणि अदित गौतम (१९), ऋतिक प्रेम विष्वकर्मा (२२) , पत्नी सरस्वती दिपक सांगळे (२१) मेव्हणी मनीषा प्रषांत आचारे (२७) या सात जणांना ताब्यात घेऊन विनोबा भावे नगर पोलिसांच्या ताब्यात दिले.
(हेही वाचा : राज ठाकरेंवर राष्ट्रवादीने का केला ‘ट्विटर’ हल्ला?)
अशी होती कोत्याची दहशत!
विनोबा भावे नगर पोलिसांनी हत्या आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून सातही जणांना या प्रकरणी अटक केली. शनिवारी सकाळी या सातही जणांना घेऊन पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दाखवलेल्या ठिकाणी खोदून कोत्याचा सडलेला मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी राजवाडी रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे. दीपक उर्फ कोत्या याची परिसरात दहशत होती, तो पत्नी तसेच मेव्हणे यांना मारहाण करून नेहमी त्रास द्यायचा, तसेच स्वतःवर वार करून तो परिसरात तरुणांवर आरोप करून त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करीत होता. त्याच्या या कृत्याला सर्वजण त्रासले होते आणि त्याला या सात जणांनी संपवण्याची योजना आखली होती. १४ जून रोजी पत्नी सरस्वती हिने कोत्याला जेवणातून १५ ते २० झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या आणि कोत्या गाढ झोपेत जाताच या सर्वांनी मिळून त्याला घरातील हत्याराने ठार केले. पाऊस असल्यामुळे रात्रीच्या वेळी बाहेर शुकशुकाट होता, हीच संधी साधून या सर्वांनी घराबाहेर खड्डा खोदून कोत्याला त्यात पुरून खड्डा बुजवला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Join Our WhatsApp Community