एफडीए अधिकाऱ्यांमधील समन्वयाअभावीच घडला हिंदू महासभा रुग्णालयातील प्रकार!

94

घाटकोपर येथील हिंदू महासभा रुग्णालयातील प्राणवायूचा अर्थात ऑक्सिजनचा साठा बुधवारी संपत आला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी युध्दपातळीवर प्रयत्न केले व वेळीच ऑक्सिजन उपलब्ध करुन, संभाव्य मोठा धोका टाळला. मात्र, सध्या ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) अधिकारी काम पाहत आहेत. त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळेच हा प्रकार घडल्याची बाब समोर येत आहे. रुगणालय व्यवस्थापनला ऑक्सिजन साठा देणारी गाडी किती वाजेपर्यंत प्राप्त होईल, याची अचूक माहिती दिली असती आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखले असते, तर हा प्रकार घडलाही नसता. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आता पाठपुरावा करणाऱ्या रुग्णालयाला कोणत्या वेळेत आणि कधी ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होईल याची अचूक माहिती देतानाच, त्यांच्याकडील साठा संपण्यापूर्वीच तो कशाप्रकारे उपलब्ध होईल याची काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यामुळे भविष्यातही असे प्रकार टाळता येतील, असे बोलले जात आहे.

काय घडला प्रकार?

एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू महासभा रुग्णालयात बुधवारी एकूण ६१ कोविड बाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. यामध्ये ५० जणांना प्राणवायू पुरवला जात होता, तर ११ रुग्ण जीवरक्षक प्रणाली अर्थात व्हेंटिलेटरवर होते. पण बुधवारी सायंकाळी ६.३० पर्यंत पुरेल, इतकाच प्राणवायूचा साठा रुग्णालयांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास महानगरपालिकेला कळवली. त्यानंतर महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या सूचनेनुसार, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या निर्देशानुसार, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) देविदास क्षीरसागर, एन विभागाचे सहाय्यक आयुक्त अजित आंबी, वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) महेंद्र खंदाडे यांनी तातडीने समन्वय साधून या रुग्णालयात वेळीच ऑक्सिजनचा साठा पोहोचवला.

(हेही वाचाः …आणि हिंदू महासभा रुग्णालयातील ६० जणांचे प्राण वाचले! महापालिका प्रशासनाच्या कामगिरीला सलाम)

समन्वयाचा अभाव

या घटनेच्या माध्यमातून, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापनामधील समन्वयाअभावी हा प्रकार घडल्याची बाब समोर आली. या रुग्णालयाने सकाळीच याची कल्पना महापालिकेला दिली असती, तर एवढी मोठी धावपळ झाली नसती. महापालिकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालय व्यवस्थापनाच्यावतीने ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाच्या समन्वयक अधिकाऱ्यांशी संपर्क सुरू होता. पण हे समन्वय अधिकारी आपल्याला ऑक्सिजन मिळेल असे सांगत होते, पण किती वाजेपर्यंत मिळेल याची कोणतीच माहिती देत नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडून मिळणारा ऑक्सिजनचा साठा प्राप्त होणार नाही, याची कल्पना आल्याने रुग्णालयाने अगदी दीड तास आधीच याची कल्पना महापालिकेला दिली.

…तर ऑक्सिजन वेळेवर मिळाला असता

ऑक्सिजनचा साठा ठाणे, नवी मुंबई आदी ठिकाणांहून आणला जात आहे. त्यामुळे समन्वयक अधिकाऱ्याने जर रुग्णालयाला ऑक्सिजन वाहून नेणारे वाहन कुठपर्यंत पोहोचले आहे आणि वाहनचालका रुग्णालयाचा क्रमांक देऊन  अचूक वेळ दिली असती तर कदाचित ही वेळ आली नसती, असेही बोलले जात आहे. त्यामुळे यामध्ये रुग्णालय व्यवस्थापनाचाही तेवढाच निष्काळजीपणा असून, त्यांनी जर याची कल्पना आधीच महापालिकेला दिली असती तर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून किंवा अन्य ठिकाणांहून ऑक्सिजन उपलब्ध करुन देता आले असते.

(हेही वाचाः रुग्णालयांकडून ऑक्सिजनचा अनावश्यक वापर! सुरज मांढरेंचे गंभीर निरीक्षण )

ऑक्सिजन उशिरा प्राप्त झाला असता तर प्लॅन-१ तयार

महापालिकेच्या सर्व वरिष्ठांनी याप्रकरणात लक्ष घातल्याने वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध करुन देता आला. त्यामुळे संभाव्य धोका टाळत ६० जणांचे जीव वाचवण्यात यंत्रणेला यश आले. पण या ६० जणांना अन्यत्र शिफ्ट करणे हे फारच जिकरीचे होते. तसेच कार्डियाक रुग्णवाहिकांची संख्याही कमी होती. त्यामुळे राजावाडीसह अन्य रुग्णालय व कोविड सेंटरमधील ऑक्सिजनचे सिलेंडर प्राप्त करुन, अन्य रुग्णांना तात्पुरत्या स्वरुपात ऑक्सिजन पुरवत टप्प्याटप्प्याने रुग्णखाटा उपलब्ध झालेल्या कोविड सेंटरमध्ये हलवण्यात येणार होते. कारण आजवर उपचार घेत असलेल्या रुग्णांची मेडिकल हिस्ट्री सर्व लिहून रुग्णाला दुसऱ्या केंद्रात दाखल करायचे होते. त्यामुळे महापालिकेची दुसरी रणनीतीही तयार होती. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी हे खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र ठरत आहेत. यापूर्वी वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, बोरीवली भगवती आणि गोवंडी शताब्दी अर्थात पंडित मदनमोहन मालवीय रुग्णालयांमध्ये, अशाचप्रकारे ऑक्सिजन साठा संपल्याने रुग्णांना अन्य कोविड रुग्णालयात हलवावे लागले होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे असलेला हा अनुभव पुन्हा एकदा हिंदु महासभा रुग्णालयाच्या या आपत्कालीन प्रसंगी कामी आला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.