मुंबईत ज्याप्रकारे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, ते पाहता आता मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, यापूर्वी एखादा रुग्ण बाधित असल्याचे आढळून आल्यावर, प्रयोगशाळांकडून त्यांचा अहवाल त्वरित महापालिकेला कळवला जात असे. पण सध्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही काही प्रयोगशाळांकडून महापालिकेला अहवाल सादर होत नसून, महापालिकाही आपल्याला असे अहवाल न आल्याने त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे अशाप्रकारे रुग्ण आपल्या नजरेतून सुटल्यास मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
समन्वयाचा अभाव
मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत कांजूरमार्ग येथील भाजप नगरसेविका सारिका मंगेश पवार यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे हा विषय मांडला. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी महापालिका आणि चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये समन्वय नसल्याचे त्यांनी सांगितले. याचे उदाहरण त्यांनी देताना हा अनुभव मला माझ्याच घरी आल्याचे सांगितले. माजी नगरसेवक मंगेश पवार हे कोरोनाबाधित झाल्यानंतर चार दिवसांनी मलाही लक्षणे जाणवू लागली. मी माझी चाचणी करुन घेतली. पण मंगेश पवार हे बाधित आढळून आल्यानंतर मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली, तेव्हा त्यांनी मला सांगितले की प्रयोगशाळेकडून आम्हाला काही कळवले नाही. म्हणून मी प्रयोगशाळेकडे विचारणा केली तेव्हा ते म्हणाले की आम्ही महापालिकेला कळवले आहे. पण जर त्यांनी महापालिकेला कळवले तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याची कल्पनाच नाही आणि त्यांचे पथकही आमच्या घरी आले नाही. त्यामुळे कुठे तरी समन्वयाचा अभाव दिसून येत असल्याचे सांगत हा प्रकार वाढत्या करोनाचा धोका लक्षात घेता फारच भीतीदायक असल्याचे सांगितले.
(हेही वाचाः मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या ५,५०४! निर्बंधाबाबत महापालिका, सरकार उदासीन!)
प्रादुर्भाव वाढण्याची भीती
जर एखाद्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येतो, तर मग त्यानंतर महापालिकेला याची कल्पना नसेल तर तो रुग्ण बिनधास्तपणे कुठेही फिरू शकतो. महापालिकेचे अधिकारी किंवा त्यांचे पथक आल्यास आजुबाजूच्या लोकांनाही याची कल्पना येते आणि त्यांना क्वारंटाईन राहणे बंधनकारक होते. पण महापालिकेलाच माहीत नसणे ही बाब गंभीर आहे. ही जरी एक घटना असली तरी मुंबईत अशाप्रकारे अनेक घटना असू शकतील. त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव वाढण्याचीही अधिक शक्यता असल्याची भीती सारिका पवार यांनी व्यक्त केली.
नगरसेवकांनी केल्या मागण्या
यावेळी झालेल्या चर्चेत भाजपच्या योगिता कोळी, डॉ.सईदा खान, शिवसेनेच्या सुजाता पाटेकर, काँग्रेसचे जगदीश अमिन कुट्टी आदींनी भाग घेत कोरोनासंदर्भात विनामास्कच्या लोकांवर कारवाई करण्यासाठी नेमलेल्या क्लीन-अप मार्शलविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच काहींनी खाजगी रुग्णालयांपेक्षा महापालिकेच्या रुग्णालय व केंद्रांमध्ये कोविड रुग्णांवर चांगल्याप्रकारे उपचार केले जात असल्याचे सांगितले. प्रत्येक विभागातील क्लीन-अप मार्शलची यादी तसेच विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची यादी स्थानिक नगरसेवकांना दिली जावी, अशीही मागणी काही नगरसेवकांनी केली. यावेळी उपायुक्त आयुक्त देवीदास क्षीरसागर यांनी महापालिका आणि प्रयोगशाळांमध्ये योग्यप्रकारे समन्वय राखण्याचा प्रयत्न सुरू असून यापुढे तो अधिक चांगल्याप्रकारे राखला जाईल, असे आश्वासन दिले.
(हेही वाचाः सावधान! २६ मेपर्यंत राहणार कोरोनाची दुसरी लाट! )
Join Our WhatsApp Community