Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटींची तरतूद

३५ हजार ७८८ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

76
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटींची तरतूद
  • नागपूर, विशेष प्रतिनिधी

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सोमवारच्या पहिल्या दोन्ही सभागृहात सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ३५ हजार ७८८ कोटी ४० लाख ५७ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. या पुरवणी मागणीत विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी कमालीच्या गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) १ हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तर मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी ३ हजार १५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी विधानसभेत पुरवणी मागण्या सादर केल्या. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना महायुती सरकारने जुलै महिन्यातील अधिवेशनात विक्रमी ९४ हजार कोटी रुपयांच्या मागण्या सादर केल्या होत्या. यावेळी सरकारने पुरवणी मागणीतून निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या योजनांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी ५१४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सोमवारी सादर झालेल्या पुरवणी मागण्यांवर १९ आणि २० डिसेंबर अशी दोन दिवस चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. (Ladki Bahin Yojana)

(हेही वाचा – WPL Auction : १६ व्या वर्षी करोडपती झालेली कमलिनी कोण आहे?)

सोमवारी सादर झालेल्या ३५ हजार ७८८ कोटींच्या पुरवणी मागण्यांपैकी ८ हजार ८६२ कोटींच्या मागण्या या अनिवार्य खर्चाच्या तर २१ हजार ६९१ कोटींच्या मागण्या कार्यक्रमांतर्गत खर्चाच्या आहेत. सरकारने ५ हजार २३४ कोटींचा निधी हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने उपलब्ध करून दिला आहे. यात केंद्र सरकारच्या विशेष सहाय्य योजनेच्या अंतर्गत ५० वर्षासाठी बिनव्याजी कर्ज योजनेसाठी ३ हजार ७१७ कोटी, विविध पाटबंधारे महामंडळाना भाग भांडवल अंशदान म्हणून १ हजार ९०८ कोटी रुपये, मोदी आवास घरकुल योजनेसाठी १ हजार २५० कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत आहे. (Ladki Bahin Yojana)

मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठी राज्य सरकारचे दुय्यम कर्ज आणि समभागासाठी १ हजार २१२ कोटी, राज्यातील पात्र सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी कर्जासाठी १ हजार २०४ कोटी, दूध अनुदान योजनेसाठी ७५८ कोटी, अंगणवाडी कर्मचारी मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी राज्य हिस्सा म्हणून २९० कोटी रुपये, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांच्या वाढीव मानधन, इतर भत्ते तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १२८ कोटी २४ लाख रुपये पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

(हेही वाचा – Cabinet मधून डच्चू मिळालेल्या माजी मंत्र्यांनी अधिवेशनाकडे फिरवली पाठ!)

पुरवणी मागणीत खातेनिहाय तरतुदी

सार्वजनिक बांधकाम : ७ हजार ४९० कोटी
उद्योग, ऊर्जा, कामगार : ४ हजार ११२ कोटी
इतर मागास बहुजन कल्याण : २ हजार ६०० कोटी
जलसंपदा : २ हजार १६५ कोटी
महिला आणि बालविकास : २ हजार १५५ कोटी
कृषी आणि पदुम : २ हजार १४७ कोटी
ग्रामविकास : २ हजार ७ कोटी
आदिवासी विकास : १ हजार ८३० कोटी
सहकार, पणन, वस्त्रोद्योग : १ हजार ३७७ कोटी

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.