विलेपार्ले येथील नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ५७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेने अठरा वर्षांपूर्वी तिने मरणानंतर अवयवदानाची इच्छा व्यक्त केली होती. या महिलेच्या कुटुंबाने हृदय, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, कॉर्निया आणि हाडे दान केली. या अवयवदानामुळे सात जणांना नवे आयुष्य मिळाले.
( हेही वाचा : रात्रशाळांतील दर्जा सुधारण्यासाठी परिपूर्ण धोरण तयार करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर)
या महिलेला दोन दिवसांपूर्वी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेच्या मेंदूत अतिप्रमाणात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने तिला डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले. ब्रेन डेड झालेल्या रुग्णांच्या शरीरातील अवयव हळूहळू निकामी होतात. त्याआगोदर शरीरातील अवयव दानासाठी वापरता येतात. रुग्णालयाच्या प्रत्यारोपण समन्वयकाने कुटुंबाशी संपर्क साधला. 2004 साली महिलेने मृत्यूनंतर अवयवदानाचा निर्णय घेतला होता. महिलेच्या इच्छेचा आदर करण्यासाठी तिच्या कुटुंबाने तिचे सर्व अवयव दान करण्यास संमती दिली. मृत्यूपश्चात हृदय, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, कॉर्निया आणि हाडे दान केली. अवयव दानासाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या रुग्णांना तातडीने शस्त्रक्रियेच्या माध्यमातून अवयव प्रत्यारोपण केले गेले.
या रुग्णांना मिळाले जीवनदान
- नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, शेवटच्या टप्प्यातील अवयव निकामी झालेल्या दोन रुग्णांवर मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपण करण्यात आले.
- गेल्या सहा वर्षांपासून डायलिसिसवर असलेल्या ४३ वर्षीय व्यक्तीवर किडनी प्रत्यारोपण करण्यात आले.
- यकृतरोग आणि हेपेटायटीसमुळे त्रासलेल्या 68 वर्षीय रुग्णाला नवे यकृत मिळाले. हा रुग्ण दोन वर्षांपासून अवयव प्रत्यारोपणासाठी नव्या यकृताच्या शोधात होता.
- ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात हृदय प्रत्यरोपणासाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला नवे हृदय मिळाले.
- परळच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या किडनी आणि स्वादुपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले.
- नोवो टिश्यू बँक अँड रिसर्च सेंटरने हाडांचे दान स्वीकारले.
- परळ येथील बच्चूअली चॅरिटेबल ऑप्थॅल्मिक आणि ईएनटी हॉस्पिटलने कॉर्निया मागवून घेतले.