पाकिस्तानने २८ मे १९९८ रोजी पाच अणुचाचण्या केल्या. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी साहेबांनी येथे येऊन आमच्याशी करार केला. पण आम्ही त्या कराराचे (Lahore Agreement) उल्लंघन केले… ही आमची चूक होती, अशी स्पष्ट कबुली माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांनी दिली आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविल्यानंतर सहा वर्षांनंतर सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या पाकिस्तान मुस्लिम लीग (Pakistan Muslim League, नवाज) पीएमएल-एनच्या सर्वसाधारण सभेत शरीफ यांनी हे वक्तव्य केले.
पाकिस्तानने केलेल्या पहिल्या अणुचाचणीला आज २६ वर्षे पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे. शरीफ यांनी २१ फेब्रुवारी १९९९ रोजी भारतासोबत केलेल्या ‘लाहोर घोषणापत्रा’चा उल्लेख केला होता. दोन्ही देशांमध्ये शांतता आणि स्थैर्य आणण्याचा या कराराचा उद्देश होता. परंतु, त्यानंतर काही महिन्यांतच पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यात घुसखोरी केली आणि कारगिल युद्ध झाले.
(हेही वाचा – Anjali Damania यांचा बोलविता धनी कोण? राष्ट्रवादी काँग्रेसचा पलटवार)
शरीफ पुढे म्हणाले की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानला अणुचाचण्या करण्यापासून रोखण्यासाठी पाच अब्ज डॉलर्सची ऑफर दिली होती, पण मी नकार दिला. माजी पंतप्रधान इम्रान खान हे माझ्या जागेवर असते, तर त्यांनी क्लिंटन यांचा प्रस्ताव स्वीकारला असता. इम्रान खान यांना सत्तेवर आणण्यासाठी आयएसआयचे माजी प्रमुख जनरल जहीरुल इस्लाम यांनी २०१७ मध्ये आपले सरकार पाडण्यात भूमिका बजावली होती, असा दावा शरीफ यांनी केला.
पाकिस्तानचे तत्कालीन सरन्यायाधीश साकिब निसार यांनी २०१७ मध्ये खोट्या प्रकरणात आपल्याला पंतप्रधानपदावरून हटवले होते, असा आरोपही शरीफ यांनी केला.
काय होता लाहोर करार ?
पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी २१ फेब्रुवारी १९९९ रोजी लाहोर येथे एका करारावर स्वाक्षरी केली होती. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्तापित करणे तसेच नागरिकांमध्ये संपर्क वाढवणे या कराराचा मुख्य उद्देश होता. मात्र, या करारावर स्वाक्षरी झाल्याच्या काही महिन्यांनंतर पाकिस्तानने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परिणामता दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले. या युद्धालाच कारगिल युद्ध म्हणून ओळखले जाते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community