मुंबईतील तबेले आणि गोशाळांमध्ये ‘लम्पी’ चा शोध : गायींचे लसीकरण पहिल्या टप्प्यात

100

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार २२६ गोजातीय जनावरे व २४ हजार ३८८ म्हैस-वर्गीय जनावरे आहेत. लम्पी साथरोगाच्या पार्श्वभूमीवर या जनावरांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले असून, महानगरपालिकेच्या कीटक नियंत्रण खात्याद्वारे गोशाळा व आजूबाजूच्या परिसरात योग्य त्या उपाययोजना करण्यास देखील प्रारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख तथा देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे. येत्या आठवड्यात यातील गायींचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : अस्मा खान निघाल्या ‘कृष्णा हिंग’च्या मालकीण, संबंध ‘टेरर फंडिंग’शी)

प्रामुख्याने गोजातीय व म्हैस-वर्गीय जनावरांमध्ये लम्पी या विषाणूच्या प्रादुर्भावाची संभाव्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने निर्गमित केलेल्या अधिसुचनेनुसार मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे महानगरपालिका क्षेत्रात विविध स्तरिय उपाययोजना सातत्याने करण्यात येत आहेत. या उपाययोजना मुंबई महानगरपालिका डॉ. इ. सिं. चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार पशुवैद्यकीय आरोग्य खात्याद्वारे करण्यात येत आहेत.

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग क्र. ४ अ असाधारण क्र. १६७ दि.०८.०९.२०२२ नुसार प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ (२००९ चा २७) याची कलमे (६), (७), (११), (१२) व (१३) अन्वये अनुसूचित रोग असल्याचे घोषित केलेल्या लंपी चर्मरोगाबाबतीत (एलएसडी) संपूर्ण महाराष्ट्र राज्य “नियंत्रित क्षेत्र” म्हणून घोषित केलेले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याने दिनांक १२ सप्टेंबर २०२२ रोजीच्या परिपत्रकान्वये पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांचा समावेश असलेला चमू गठीत केला आहे. या चमुद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तबेले व गोशाळा यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे. तसेच महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागास गोशाळा व आजूबाजूच्या परिसरात fogging आणि कीटक नियंत्रण करण्याबाबत उपाययोजना करण्यास सांगण्यात आलेले आहे.

सन २०१९ च्या पशुगणनेनुसार संपूर्ण मुंबईत ३,२२६ गोजातीय जनावरे व २४,३८८ म्हैसवर्गीय जनावरे असून, प्राधान्याने ३,२२६ गोजातीय जनावरांचे लसीकरण या आठवड्यात पूर्ण करण्यात येणार आहे. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, २००९ मधील कलम ४ (१) अनुसार पशुंमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास त्वरित संबंधित माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्यास कळविणे बंधनकारक आहे. त्याकरिता ०२२-२५५६-३२८४ आणि ०२२-२५५६-३२८५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

लम्पी चर्मरोगावर (एलएसडी) नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निर्मूलन करण्याकरिता गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची, ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात; त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई.

बाह्य कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये. बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.

गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात. बाधित परिसरात स्वच्छता ठेवावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी. फवारणीसाठी १ टक्के फॉर्मलीन किंवा २ ते ३ टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल २ टक्के यांचा वापर करावा, अशा सूचना तबेला आणि गोशाळा मालकांना महापालिकेने केल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.