पुन्हा कसारा घाटात कोसळली दरड! ‘या’ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द!

सोमवारी, १९ जुलै रोजी पहाटे ५ वाजता कसारा घाटात दरड कोसळली होती.

मुसळधार पावसाने घाटमाथ्यावर अक्षरशः कहर सुरु केला आहे. तीनच दिवसांपूर्वी कसारा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली होती, त्याची पुनरावृत्ती बुधवारी, २१ जुलै रोजी झाली. मध्यरात्री येथे पुन्हा रेल्वे मार्गावर दरड कोसळली, त्यामुळे मुंबईहून बाहेर गावी जाणाऱ्या बहुतांश लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरड कोसळल्याने ट्रॅकवर पडलेली माती काढण्याचे काम सुरु आहे.

या लांबपल्ल्याच्या गाड्या केल्या रद्द!

रड नेमकी घाटातच रेल्वे मार्गावर कोसळल्याने रेल्वे मार्गाला याचा जबर फटका बसला आहे. मुंबईहून बाहेर जाणाऱ्या सीएसएमटी-हैदराबाद स्पेशल, सीएसएमटी-लातूर स्पेशल, सीएसएमटी-वाराणसी सुपरफास्ट स्पेशल, सीएसएमटी-भुवनेश्वर स्पेशल, सीएसएमटी-गडग स्पेशल, सीएसएमटी-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) स्पेशल, सीएसएमटी-हजूर साहेब नांदेड स्पेशल या लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर ज्या गाड्या अर्ध्यावर थांबवण्यात आल्या आहेत, त्या दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तर 2111 कल्याण अमरावती एक्सप्रेस (डाऊन) खर्डी स्थानकात थांबली होती, आता ही ट्रेन मुंबईच्या दिशेने परत येणार आहे. हावडा एक्सप्रेस आसनगाव रेल्वे स्थानकात, तर सिद्धेश्वर एक्सप्रेस बदलापूरला थांबली आहे.

तीनच दिवसांपूर्वी कोसळलेली दरड! 

सोमवारी, १९ जुलै रोजी पहाटे ५ वाजता कसारा घाटात दरड कोसळली होती. घटनास्थळी रेल्वेची आपत्कालीन सहायता टीम, आरपीएफ कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. अप व डाउन मार्गाची वाहतूक धीम्या गतीने सुरु होती, मात्र त्यावेळी लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या नव्हत्या. दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण केले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here