मुंबईत चार महिन्यांत ‘इतके’ वाढले गुन्हे!

मागील चार महिन्यांत वाहन चोरी, जबरी चोरी, खुनाचे प्रयत्न, खंडणी आणि इतर अशा ५,०६७ गुन्ह्यांची नोंद झाली. तर एकूण १,११० महिलांवरील गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

74

कोरोनाच्या महामारीमुळे नागरिक भयभीत झालेले असताना कोरोनामध्ये मुंबईतील गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. हत्या, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न आणि महिलांवरील गुन्ह्यात मागील चार महिन्यांत कमालीची वाढ होताना दिसत आहे. मुंबईत वाढत्या गुन्हेगारीचा आलेख तसेच महिलांवरील गुन्ह्यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार मुंबईत मागील चार महिन्यांत ५० जणांची हत्या झाली असून लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाचे ९०० गुन्हे चार महिन्यांत मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात दाखल झालेले आहे. त्याचबरोबर चोरी, वाहनचोरी, जबरी आणि खुनाचे प्रयत्न या गुन्ह्यांत देखील वाढ झाली आहे.

लॉकडाऊनच्या काळात नोकऱ्या गेल्यामुळे गुन्हेगारीत वाढ!

राज्यात गेल्या वर्षी मार्च २०२० मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, मुंबईसह राज्यात कडकडीत लॉकडाऊन लावण्यात आला होता. गेल्या वर्षी मुंबईत लॉकडाऊनच्या काळात गुन्ह्यात कमालीची घट झाली होती. सप्टेंबर २०२० मध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर मुंबईतील जनजीवन सुरळीत होत असताना फेब्रुवारी २०२१ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने व्यवस्थित बसत चाललेली मुंबईकरांची घडी पुन्हा विस्कळीत चालली आहे. त्यात राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले असले, तरी मुंबईतील गुन्हेगारीने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनच्या काळात नोकऱ्या गेल्यामुळे अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यात बँकांचे हप्ते, घरभाडे, घरखर्च, मुलाच्या शिक्षण या सर्वांमुळे घरातील कर्ता पुरुष मानसिक तणावातून जात असून नकळत त्याच्या हातून गुन्हे घडत आहे.

(हेही वाचा : चक्रीवादळामुळे मुंबईतील ५८० कोरोनाग्रस्त रुग्णांचे रात्रीच स्थलांतर!)

लैंगिक अत्याचार, विनयभंगाच्या १,११० गुन्ह्यांची नोंद!

मुंबईत जानेवारी ते एप्रिल २०२१ या चार महिन्यांत मुंबईत ५० हत्यांचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आले असून त्यापैकी जवळपास सर्व गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून या हत्या घरगुती कलह आणि किरकोळ वादातून झालेले असल्याचे समोर आले आहे. तसेच वाहन चोरी, जबरी चोरी, खुनाचे प्रयत्न, घरफोडी या सारख्या गुन्ह्यात देखील मागील चार महिन्यांत वाढ झाली आहे. मागील चार महिन्यांत वाहन चोरी, जबरी चोरी, खुनाचे प्रयत्न, खंडणी आणि इतर असे एकूण जवळपास ५,०६७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तसेच महिलांवरील गुन्हे लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाचे जानेवारी ते एप्रिल २०२१ मध्ये एकूण १,११० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. वाढत्या गुन्हेगारी सोबत गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रमाण काही गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात असून काही चोरी, वाहन चोरी, घरफोडी आणि जबरी चोरी सारखे गुन्हे उघडकीस आणायचे प्रमाण कमी असल्याचे मुंबई पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावरील आकडेवारीतून समोर येत आहे.

महिना                         एकूण गुन्हे

  • जानेवारी २०२१           – १,६९७
  • फेब्रुवारी २०२१            – १,६९९
  • मार्च २०२१                – १,५८७
  • एप्रिल २०२१              – १,१९४
  • जाने ते एप्रिल २०२१      –  ६,१७७
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.