सध्याचा कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांचे जीव महत्वाचे आहेत. त्यामुळे मंगळवारी, १ जून रोजी पंतप्रधानांनी केंद्रीय शिक्षण मंडळांच्या १२वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे आम्ही स्वागत केले आहे. १२वीच्या परीक्षेबाबत आम्ही केंद्राच्या भूमिकेचा विचार करत आहोत, असे सांगत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील १२वीचीही परीक्षा रद्द करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार १२वीचा निकाल परीक्षेशिवाय कसा लावणार, यावर तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे.
शिक्षणमंत्र्यांचा सावध पवित्रा!
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाणीवपूर्वक परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली नाही. कारण गुरुवारी, ३ जून रोजी एकाच दिवशी मुंबई उच्च न्यायालयात राज्यातील इयत्ता १० वीच्या परीक्षेवर आणि सर्वोच्च न्यायालयात केंद्रीय शिक्षण मंडळाच्या १०वी आणि १२ वीच्या परीक्षांवर सुनावणी होणार आहे. कारण सर्वोच्च न्यायालयात १२वीबाबतही हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. त्यावरही न्यायालय निर्णय देणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यावर मुंबई उच्च न्यायालय राज्यातील १०वीच्या परीक्षेबाबत दाखल याचिकेवर निर्णय घेणार आहे. अशा वेळी जर राज्याने १२वी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला, तर १०वीच्या निर्णयावर परिणाम होईल, या भीतीपोटी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निर्णय जाहीर केला नाही, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
(हेही वाचा : राज्यात 12वीची परीक्षा रद्द होणार? काय ठरले कॅबिनेट बैठकीत?)
काय असेल १२वीच्या निकालाचा फॉर्म्युला?
- केंद्रीय शिक्षण मंडळाच्या १०वीच्या निकालाच्या फॉर्म्युलानुसार १२वीचाही निकाल तयार केला जाईल. इयत्ता ९वी, १०वी आणि ११ वीचा निकाल आणि १२वीचे वर्षभराचे मूल्यांकन करून निकाल घोषित होण्याची शक्यता आहे.
- ११वीची वार्षिक परीक्षा झाली नाही, मात्र चाचणी आणि सहामाही परीक्षा झाल्या आहेत. त्या परीक्षांचा निकाल आणि १२वीच्या वर्षभराचे वार्षिक मूल्यांकन करून १२वीचा निकाल लावला जाण्याची शक्यता आहे.
- नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत अनेक महाविद्यालये सुरु होती, त्या दरम्यान अनेक महाविद्यालयांनी प्रॅक्टिकल परीक्षा घेतल्या आहेत. त्यामुळे त्याचे गुणही निकालात ग्राह्य धरता येणार आहेत.
Join Our WhatsApp Communityजर १२वीचा निकाल ९वी, १०वी आणि ११वी इयत्तांच्या निकालांवर आधारित लावला जाईल, तर माझा व्यक्तीशः याला विरोध असेल, कारण ९वीचा निकाल फारच प्राथमिक ठरेल. अनेक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा हा १०वीपासून वाढलेला असतो. त्याऐवजी केवळ ११वीचा निकाल आणि १२वीच्या वर्षाचे शैक्षणिक मूल्यांकन करून निकाल दिल्यास विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यांकन होईल.
– अशोक साळवे, अध्यक्ष, होली रोझ इंग्लिश स्कूल