महानगरपालिका सुरक्षा दलाच्या जवानांना अद्ययावत प्रशिक्षण; डॉ. संजीव कुमार यांनी व्यक्त केला विश्वास

205
महापालिका सुरक्षा दलाचे अत्याधुनिकीकरण करणे, सुरक्षा दलातील कर्मचा-यांना अद्ययावत प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यासह भरती प्रक्रिया राबविण्याबाबत मुंबई महानगरपालिका प्रशासन सकारात्मक प्रयत्न करित आहे. यामुळे महानगरपालिकेचे सुरक्षा दल हे अधिक सक्षम व सामर्थ्यशाली होण्यास निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास महानगरपालिका अतिरिक्त  आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई महानरगपालिकेच्या सुरक्षा दलाला ५७वा वर्धापनदिन व पारितोषिक वितरण सभारंभ महापालिका अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते १ मार्च २०२३) रोजी भांडुप (पश्चिम) परिसरातील खिंडीपाडा मार्गावर असणा-या सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्र येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख सुरक्षा अधिकारी (प्र.) अजित तावडे यांच्यासह मोठ्या संख्येने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाचे अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. संजीव कुमार यांनी हा विश्वास व्यक्त केला.
ते म्हणाले की, आपल्या मुंबई महानगरपालिकेची व्याप्ती व कर्तव्ये लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेचा सुरक्षा विभाग हा महानगरपालिकेच्या मालमत्तांचे संरक्षण व सुरक्षितेच्या दृष्टीने महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असतो. विशेष म्हणजे या विभागातील कर्मचा-यांची संख्या कमी असताना देखील हा विभाग त्यांना नेमून दिलेली कर्तव्ये चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे. ही कौतुकास्पद बाब असल्याचे डॉ. संजीव कुमार यांनी नमूद केले. या विभागात नवीन मनुष्यबळ नेमण्यासह सुरक्षा दलातील सर्वच कर्मचा-यांना अत्याधुनिक स्तरीय अधिकाधिक प्रशिक्षण मिळावे, यासाठी प्रशिक्षण केंद्राचे आधुनिकीकरण प्रस्तावित असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
आजच्या कार्यक्रमादरम्यान प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांनी आपल्या भाषणा दरम्यान सुरक्षा दलाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलास महाराष्ट्र राज्याच्या पथसंचलनामध्ये द्वितीय पारितोषिक मिळाल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करित त्यांनी सुरक्षा दलातील अधिकारी व कर्मचा-यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर केलेल्या उल्लेखनिय कामगिरीची माहिती दिली. तसेच सुरक्षा दलातील अधिकारी व कर्मचारी हे आपली कर्तव्ये सांभाळून विविध क्रीडा व कला क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कामगिरी करित असल्याची बाब कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
bmc1
दरम्यान, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते सुरक्षा दलातील अधिकारी व कर्मचारी यांना विविध स्तरावरील पारितोषिक पटकावल्याबदल मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या चमुचे कप्तान समीर माने, कबड्डी स्पर्धेतील विजेत्या चमुचे कप्तान मनोज चौगुले, रस्सीखेच स्पर्धेतील विजेता लक्ष्मण गोळे, व्हॉलिबॉल स्पर्धेतील विजेत्या चमुचे कप्तान हरिश्चंद्र पाटील यांचा समावेश होता.
bmc2
या वर्धापनदिनी झालेल्या आयोजित संचलनामध्ये सुरक्षा दल प्लाटून क्रमांक ३ च्या संचलनास सर्वोत्कृष्ट संचलनाचे पारितोषिक अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले. प्लाटून क्रमांक ३ चे कप्तान शेखर उधराज यांनी त्यांच्या प्लाटूनच्या वतीने सर्वोत्कृष्ट संचलनाचा मानाचा चषक स्वीकारला. तर लवकरच निवृत्त होणारे सहाय्यक सुरक्षा अधिकारी संदीप पाटील यांचा कार्यक्रमादरम्यान गौरव करण्यात आला.
दरम्यान, आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांना सुरक्षा दलातर्फे मानवंदना देण्यात आली. ज्यानंतर त्यांनी परेडचे निरिक्षण केले. त्यानंतर सुरक्षा दलातील विविध पथकांचे अत्यंत शिस्तबद्ध संचलन झाले. तर कोणताही शब्दोच्चार न करता केवळ इशारा करत आदेश देऊन करण्यात आलेल्या मौन कवायतीने उपस्थितांची मने जिंकून घेतली. कार्यक्रमानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी भांडुप संकुल परिसरातील सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्राची व तेथील उपलब्ध सोई-सुविधांची पाहणी केली. याप्रसंगी प्रमुख सुरक्षा अधिकारी  अजित तावडे हे देखील त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.