मुंबईतील १२९ वर्षे जुन्या असलेल्या पुरातन महापालिका मुख्यालय इमारतीच्या दुरुस्तीचे काम शिखर परिषदेसाठी उपस्थित राहणाऱ्या शिष्टमंडळाच्या आगमनापूर्वी घाईघाईत करण्यात आले. परंतु हे घाईघाईत केलेले कामच आता महापालिकेच्या गळतीचे कारण बनले आहे. कंत्राटदाराने इमारतीच्या मंगलोर कौलाच्या दुरुस्तीकडे विशेष लक्ष न देता तळ आणि पहिल्या आणि दुसऱ्यावरील व्हरांड्याचा भाग चकाचक करण्याकडे अधिक भर दिल्यामुळे छताकडील भाग दुर्लक्षितच राहिला. परिणामी दुसऱ्या मजल्यावर गळती लागलेली असून आयुक्त वापरत असलेल्या प्रवेशद्वार क्रमांक २ जवळील लिफ्टलाच याचा फटका बसला. परिणामी ही लिफ्ट बंद ठेवण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे.
मुंबईचे दमट हवामान व सततच्या ऊन पावसामुळे महापालिका मुख्यालयाच्या इमारतीला असलेल्या दगडी भिंतीवर रासायनिक प्रक्रिया होऊन, इमारतीच्या दगडांना बुरशी येणे, दगडांच्या खाचांमध्ये वनस्पतींची वाढ होणे, नवीन भेगा तयार होणे, दगडांचे आवरण झिजणे आदी बाबींमुळे इमारतीचा बाहेरील भाग खराब दिसतो. ज्यामध्ये घुमट, तुळ्या, कमानी आदी बांधकामांच्या भागांची विशेष दुरुस्ती करून इमारतीचे आयुष्य वाढवणे तसेच अनेक ठिकाणाहून होणारी गळती थांबवण्यासाठीची प्रकिया करणे आदी कामांच्या दृष्टीकोनातून दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्ट्रक्टवेल डिझायनर्स अँड कन्सल्टंट या सल्लागार कंपनीच्या मार्गदर्शनाखाली हे काम हाती घेण्यात आले. यासाठी एम देवांग कन्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली असून या कंपनीच्या माध्यमातून विविध करांसह ९ कोटी ९२ लाख रुपये मंजूर केले होते.
या नुतनीकरण तथा दुरुस्तीच्या कामामध्ये मंगलोर छत व त्यांच्या लाकडी बांधकामांची दुरुस्ती, छतावरील लाकडी फळ्या काढून दुरुस्ती करणे व नवीन बसवणे, छतांची गळती बंद करणे, बाथरुममधील गळती दुर करणे, लाकडी मजल्यांच सांधे स्टेनलेस स्टील अथवा लोखंडी प्लेट द्वारे मजबूत करणे आदी प्रकारच्या सामावेश होता. हे काम जी २० च्या शिखर परिषदेच्या शिष्टमंडळाच्या महापालिका मुख्यालयातील आगमनापूर्वी अत्यंत घाईघाईत दीड महिन्यांमध्ये पूर्ण केले. परंतु संपूर्ण इमारतीची रखरखाव करताना छताचे काम योग्यप्रकारे न झाल्याने दुसऱ्या मजल्यावर उपमहापौरांच्या कार्यालयाबाहेर महापालिका वस्तूसंग्रहालयात शेजारी व महापालिका आयुक्तांचे पत्र व्यवहार स्वीकारण्याच्या कार्यालयाशेजारी छतातून पाण्याची गळती होण्यास सुरुवात झाली.
(हेही वाचा – Hindusthan Post Impact : महात्मा फुले जन आरोग्य योजनेसंदर्भातील ‘जीआर’ अखेर निघाला)
ही गळती सुरु असतानाच छतातून होणाऱ्या गळतीचे पाणी लिफ्टच्या शेजारील भिंतीवर होऊन लिफ्टच्या विद्युत तारांमध्ये तसेच प्लगमध्ये शिरल्याने त्यातून शॉर्ट सर्कीटची घटना गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. परंतु लिफ्ट चालकाने प्रसंगावधान राहत लिफ्ट सुरक्षितपणे बंद केली. लिफ्टच्या बटनाच्या विद्युत वायरींमध्ये पाणी शिरल्याने लिफ्टसाठी बटन दाबताच विजेचा झटका लागण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे त्वरीत ही लिफ्ट केली. त्यामुळे या लिफ्टच्या विद्युत जोडणीत गेलेले पाणी प्रखर विद्युत दिवे लाऊन सुकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ही विद्युत जोडणीचा भाग सुकवण्याचा प्रयत्न केला गेला. याच लिफ्टमधून महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहणारे अतिमहत्वाची व्यक्ती तसेच अभ्यांगत येत असतात. त्यामुळे शुक्रवारी ही लिफ्ट बंद ठेवण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community