पावसाच्या पाण्यात बुडून बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू

163
नागपूरातील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या बाहेरील मोकळ्या वनक्षेत्रातील नाल्यात सोमवारी सकाळी बिबट्याचा बछडा मृतावस्थेत वनाधिका-यांना आढळला. बिबट्याचा बछडा अंदाजे २ ते ३ दिवसांचाच असल्याचा पशुवैद्यकीय अधिका-यांचा अंदाज आहे. रात्री पावसाच्या पाण्यात बिबट्याच्या बछड्याचा बुडून मृत्यू झाल्याचे वनविभागाने केलेल्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले.
गोरेवाडा प्रकल्पाच्या राखीव वनक्षेत्रात काही बिबट्यांचा मुक्त वावर आहे. त्यातील एका मादी बिबट्याकडून नुकतेच जन्मलेल्या बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला. हा बिबट्याचा बछडा गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील नसून, प्राणिसंग्रहालयाचे कुंपण सुरक्षित आहे. कोणताही प्राणी कुंपण तोडून बाहेर जाऊ शकत नाही, अशी माहिती गोरेवाडा प्राणिसंग्रहलायाकडून दिली गेली.

शवविच्छेदनातून मृत्यूचे कारण समोर 

अंदाजे २ ते ३ दिवसांच्या बिबट्याच्या बछड्याचे गोरेवाडा प्रकल्पातील वन्यप्राणी बचाव केंद्रात नुकतेच शवविच्छेदन करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुजित कोलंगत आणि डॉक्टर मयुर पावशे यांनी बिबट्याच्या बछड्याचे शवविच्छेदन केले. बिबट्याच्या मृत बछड्याचे दहन गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक शतानिक भागवत, सहाय्यक वनसरंक्षक, विजय सूर्यवंशी, वनपरिक्षेत्र अधिकारी निलय भोगे, वनपाल सुरेश चाटे, वनरक्षक सुरेश चाटे, वनरक्षक लता मांढळकर, वनमजूर राजन वासनिक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी अजिंक्य भाटकर, वन्यप्राणी रक्षक प्रतिनिधी कुंदन हाते उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.